Maharashtra Samruddhi Mahamarg: नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचा (Samriddhi Highway) घोटी ते भिवंडी हा शेवटचा टप्पा डिसेंबरपासून सुरू होणार आहे. तशा सूचना राज्य सरकारकडून MSRDC ला देण्यात आल्या आहेत. MSRDCच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानंच 'एबीपी माझा'ला ही माहिती दिली. एप्रिल 2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुका आहेत. तर ऑक्टोबर 2024 मध्ये विधानसभा निवडणुका होतील. त्याच्या आधी जनतेसाठी हा संपूर्ण महामार्ग खुला करण्याचा सरकारचा मानस आहे. 


सध्या नागपूर ते शिर्डी असा 501 किमीचा टप्पा सुरू आहे. शिर्डी ते भिवंडी या टप्प्याचं काम अजूनही सुरू आहे. याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे सिन्नर ते कसारा टप्प्यात 12 बोगदे आणि 16 छोटे पूल उभारावे लागणार आहेत. इगतपुरी ते भिवंडीजवळील आमने गाव हा शेवटचा टप्पा डिसेंबर अखेरीस खुला केला जाईल. हा टप्पा पूर्ण झाल्यावरच मुंबईकरांना समृद्धी महामार्गाचा पूर्ण लाभ घेता येईल. कारण सध्या शिर्डीपर्यंत जुन्या महामार्गानंच जावं लागतं, ज्यासाठी अडीच ते चार तास लागतात. 


'समृद्धी' महामार्गाचं वेळापत्रक 



  • शिर्डी ते सिन्नर : मार्च अखेरीस खुला करणार

  • सिन्नर ते चांदवड : मे महिन्यात खुला होणार

  • चांदवड ते घोटी (इगतपुरी) : जूनमध्ये पूर्ण होणार

  • घोटी ते आमने (भिवंडी) : डिसेंबरच्या शेवटी पूर्ण करणार


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला 701 किलोमीटरचा नागपूर-मुंबई हायस्पीड ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे असलेला हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग येत्या डिसेंबर 2023 पर्यंत पूर्णत्वास नेण्याचं शिंदे-फडणवीस सरकारचं उद्दिष्ट असल्याचं समोर आलं आहे. MSRDC च्या एका उच्च पदस्थ अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, तशा सूचना सरकारने समृद्धी महामर्गावरील अधिकाऱ्यांना दिल्या असून हा महामार्ग सध्या नागपूर ते शिर्डीपर्यंत सुरू झालेला आहे. लवकरच दुसरा 44 किमीचा टप्पा सिन्नरपर्यंत सुरू होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. 


पुढल्या वर्षी म्हणजे 2024 मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लागण्याआधी समृद्धी महामार्गाचं काम पूर्ण करून हा महामार्ग सुरू करण्याचं उद्दिष्ट सरकारचं असल्याचं यावरून स्पष्ट होत आहे. समृद्धी महामार्ग हा शिंदे-फडणवीस सरकारचं प्राधान्य असलेल्या प्रोजेक्टपैकी सर्वात वर असल्याचंही अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. सध्या सिन्नरपासून इगतपुरीपर्यंत घाट सेक्शन असल्यानं काम सुरक्षितपणे सुरू असून आम्ही लक्षाच्या आधीच हा पूर्णत्वास नेऊ, असंही समृद्धी महामार्गाच्या अधिकाऱ्यांना वाटत आहे.