नागपूर :  समृद्धी महामार्गाचे 11 डिसेंबर 2022 ला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते  पहिल्या टप्प्याचं उद्घाटन झालं. प्रवासाच्या गतीसोबतच अपघाताचा वेगही वाढला.  गेल्या सहा महिन्यात हजाराहून अधिक अपघात या महामार्गावर झालेत.  शनिवारी झालेल्या बस अपघातात 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला. आता याच अपघाताचा फॉरेन्सिक अहवाल समोर आला आहे


बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा जवळ समृद्धी महामार्गावर अपघात झालेल्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बस संदर्भात फॉरेन्सिक फायर रिपोर्ट समोर आला आहे.. फॉरेन्सिक फायर अँड सायबर इन्वेस्टीगेटर्स या मुंबईच्या संस्थेने त्या संदर्भात तपास करून एक अहवाल बुलढाणाच्या जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे. 


फॉरेन्सिक अहवालात काय?



  • अपघात झाला तेव्हा बस समृद्धी महामार्गाच्या पहिल्या लेनमध्ये होती

  • जी मुळात ओव्हरटेकिंग लेन आहे

  • अपघाताच्या वेळी  बसची गती 70 ते 80 किलोमीटर  प्रति तास होती

  • अपघातग्रस्त बसचं समोरचं चाक सुरुवातीला साईन बोर्डला धडकलं

  • त्यानंतर बस दहा फूट अंतरावर असलेल्या दुभाजकाला धडकली

  • ही धडक एवढी  भीषण होती की मागील टायर फुटला

  •  टायरच्या आतील लोखंडी रिंग मोडकळीस आली

  • बस एका बाजूला झुकली आणि काही अंतरावर जाऊन उलटली

  • बसच्या समोरचा एक्सेल तुटून वेगळा झाला आणि डिझेल टँकवर आदळला

  • त्यामुळे डिझेल टँकमधलं 350 लिटर डिझेल सर्वत्र सांडलं

  • डिझेल इंजिनच्या हॉट एक्झॉस्टच्या संपर्कात आले आणि बसने पेट घेतला


वाहतुकीचे नियम मोडून ही बस धावत होती. खरं तर वाहतुकीचे नियम मोडण्याचा एक विक्रमच या बसच्या नावे आहे.


बसवर नियम मोडण्याचा  विक्रम



  • 5 फेब्रुवारी 2021 पीयुसीचा कालावधी संपल्याने 1200 रुपयांचा दंड

  • 24 ऑगस्ट 2022 - बसचे फिटनेस प्रमाणपत्र नसणे, अयोग्य लाईटचा वापर करणे यासाठी 4500  रुपयांचा दंड

  • 11 ऑक्टोबर 2022 - बसच्या फिटनेस प्रमाणपत्राचा कालावधी संपल्याने 23, 500 रुपये दंड

  • अग्निशमन सुरक्षा  यंत्रणा कार्यरत  नसल्याने 500 रुपये दंड

  • आपात्कालीनद्वार काम करत नसल्याने दोन हजार रुपये 

  • ड्रायव्हर समोरची काच फुटल्याने 500 रुपये दंड 

  • जानेवारी 2023 मध्ये नो पार्किंगमध्ये बस उभी केल्याने 500 रुपयांचा दंड

  • 12 जून 2023- क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवणे, बसच्या विंडोची काच फुटलेली असणे, बस मध्येच कुठेही थांबवणे


अशा विविध  नियमांच्या उल्लंघन  प्रकरणी 11200 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. या बसच्या नावे गेल्या तीन वर्षात 45 हजारांहून अधिकची चलनं फाडण्यात आली आहेत. जो दंड तीन वर्षात भरला नाही तो दंड बसचे जळून सांगाडे झाल्यावर भरण्यात आला आहे. त्यामुळे परिवहन विभागाच्या दुर्लक्षामुळेचहा अपघात घडला का असाही सवाल उपस्थित होतोय. वारंवार वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या बसला तेव्हाच कारवाईचा ब्रेक लावला असता तर कदाचित त्या 25 जणांचा जीव वाचला असता.