Samruddhi Mahamarg:  समृद्धी महामार्गावर एक जुलैच्या पहाटे झालेल्या भीषण अपघातात (Samruddhi Mahamarg Accident) 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. या घटनेनंतर समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) काय उपाययोजना करता येऊ शकतात यावर चर्चा करण्यासाठी आज बुलढाणा जिल्हा (Buldhana) पोलीस अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष बैठकीचा आयोजन करण्यात आलं होतं. यात जिल्ह्यातील आरोग्य समृद्धी महामार्गावरील अधिकारी समृद्धी महामार्ग ज्या पाच पोलीस स्टेशनच्या हद्दीतून जातो त्या पाच पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी हे या बैठकीला उपस्थित होते.


या बैठकीत अपघात रोखण्यासाठी अनेक उपाययोजनांवर चर्चा झाली. या बैठकीनंतर पोलीस अधीक्षक यांनी या उपायोजनांवर माहिती दिली. बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर कोणत्या उपाययोजना आखण्यात येणार याची माहिती त्यांनी दिली. 


समृद्धी महामार्गावर झालेल्या बसच्या भीषण अपघातानंतर मात्र आता पोलीस प्रशासन परिवहन प्रशासन व आरोग्य प्रशासन खडबडून जागे झाले असून शक्यतो अपघात होऊच नये यासाठी अनेक उपाययोजना आखण्यात येत आहेत तर अपघात झाल्यावर तात्काळ मदत मिळावी यासाठी सुद्धा अनेक पथक तयार करण्यात येणार असल्याची माहिती समृद्धी महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे 


बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर कोणत्या उपाय योजना?


- समृद्धी महामार्गावर एन्ट्री पॉईंट पासूनच अनेक साइन बोर्ड लावण्यात येतील. ज्यात मनोरंजनात्मक फलक सुद्धा असणार आहेत


- समृद्धी महामार्गावरील ज्या ठिकाणी अपघाताच्या जास्त घटना घडल्या आहेत. अशा ठिकाणी बंप बसवण्यात येणार आहे ज्यामुळे वाहन चालक सतर्क होईल. 


- समृद्धी महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यातील पाचही पोलीस स्टेशनचे पेट्रोलिंग पथक हे गस्त घालत राहतील. 


- अपघात होऊ नये म्हणून वाहन चालकांची जनजागृती करण्यात येणार आहे. 



बंप म्हणजे काय?


बंप म्हणजे रंबलर स्ट्रिपस. आठ ते दहा छोटे-छोटे गतिरोधक असतात. त्यावरून वाहन नेताना वेग कमी करण्याची गरज नसते. फक्त त्यावरून वाहन गेल्यास धावत्या वाहनामध्ये व्हायब्रेशन तयार करतात. जर वाहन चालकाच्या डोळ्यावर झोप असेल, आळस असेल तर या व्हायब्रेशनने सतर्क होतो. 


समृद्धी महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यातीलच अपघातांचे प्रमाण जास्त का?


समृद्धी महामार्ग तयार झाल्यापासून बुलढाणा जिल्ह्यातील 88 किलोमीटरच्या पट्ट्यात अपघातांचे प्रमाण हे इतर ठिकाणापेक्षा थोडे जास्तच आहे. सध्या समृद्धी महामार्ग हा नागपूर ते भरवीरपर्यंत सुरू झालेला आहे. नागपूर ते भरवीर हे अंतर 600 किलोमीटरचं आहे.  या सहाशे किलोमीटरचा केंद्र किंवा मध्य भाग हा बुलढाणा जिल्ह्याचा 88 किलोमीटरचा समृद्धी महामार्गाचा पट्टा आहे. 


ज्यावेळी एखादे वाहन चालक आपला वाहन घेऊन नागपूरहून निघतो, त्यावेळी तो सलग 300 किलोमीटर वाहन चालवत बुलढाणा जिल्ह्यातील या पट्ट्यात पोहोचतो किंवा भरवीरकडून नागपूरकडे जाणारा चालक हाही तिनशे किलोमीटर वाहन चालवत बुलढाणा जिल्ह्याच्या या पट्ट्यात पोहोचतो. सलग तीनशे किलोमीटर वाहन चालवल्याने वाहन चालकाचा मेंदू हा थकलेला असतो. त्यामुळे अपघात घडण्याची शक्यता असते.