बुलढाणा: नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये अनेक राजकीय उलथापालथ झाल्याचं दिसून आलं. काही पक्षांना जागा न मिळाल्याने त्यांनी बंडखोरी देखील केली. मात्र अशातच काही नेत्यांनी पक्षविरोधात कारवाई केल्यानं त्यांच्यावरती आता कारवाईचा बडगा उगारला जात आहे. पक्ष विरोधी कारवाया केल्या म्हणून बुलढाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) महिला जिल्हाध्यक्षा अनुजा सावळे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षाकडे तक्रार केली म्हणून अनुजा सावळे यांनी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष नाझेर काझी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
काय आहे प्रकरण?
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत बुलढाणा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाच्या महिला जिल्हाध्यक्ष अनुजा सावळे यांनी सिंदखेड राजा मतदार संघात पक्षाचे अधिकृत उमेदवार असलेले आमदार मनोज कायंदे यांच्या विरोधात काम केल्याचा ठपका ठेवत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नाझेर काझी यांनी पक्षाचे अध्यक्ष अजित पवार व महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने बुलढाणा जिल्हा राष्ट्रवादी महिलाध्यक्ष अनुजा सावळे यांची तात्काळ हकालपट्टी करण्यात आली आहे. तर दुसरीकडे अनुजा सावळे यांची हकालपट्टी केल्याने त्यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नझेर काझी यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात राष्ट्रवादी (अजित पवार) काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. याबाबतचं पत्र देखील देण्यात आलं आहे.
काय लिहलं आहे पत्रात?
पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षा अनुजा सावळे पाटील ह्या अतिशय निष्क्रीय आहेत. जिल्ह्यात महिला संघटना अस्तित्वात नाही असे चित्र आहे. ते वास्तव आहे.जिल्ह्यातील महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी त्यांचा संवाद नाही. संपर्क नाही. केवळ समाज माध्यमांवर त्या सक्रीय असतात, यापलिकडे त्यांचे कुठलेही काम नाही. त्यांच्या विषयी प्रचंड नाराजी आहे. दुसरे असे की, नुकत्याच संपन्न झालेल्या विधानसभा निवडणूकीत त्यांनी सिंदखेडराजा मतदारसंघातील उमेदवार मनोज कायंदे यांचे विरोधात काम केले. त्या मुळच्या सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील मौजे देवखेड येथील आहेत. त्या एकदाही सिंदखेडराजा मतदारसंघात प्रचारार्थ आल्या नाहीत. केवळ दिनांक १२/११/२०२४ रोजी सिंदखेडराजा येथे जाहीर सभा होती. त्या सभेसाठी त्या उपस्थित झाल्या परंतु, दादांची सभा रद्द झाली हे समजल्याबरोबर त्या तेथून निघून गेल्या. त्याचदिवशी दुपारी भुजबळ साहेबांची जाहीर सभा झाली, त्या सभेला त्या थांबल्या नाही. जिल्ह्यात महिला संघटनेत त्या एकट्याच आहेत. त्यांच्या विचित्र स्वभावामुळे महिला संघटन पुर्णतः विस्कळीत झाले आहे.
तरी, विनंती की, त्यांची कमालीची निष्क्रीयता, पक्ष विरोधी काम या बाबींची गंभीर दखल घेऊन त्यांना पक्षातून निष्कासित करण्याची कार्यवाही सत्वर करावी, ही विनंती, त्या केवळ वरिष्ठ नेत्यांच्या सतत भेटी घेऊन सक्रीय असल्याचे चित्र निर्माण करतात, हे येथे उल्लेखनीय आहे, असं पत्रात लिहण्यात आलं आहे.