Buldhana Arban bank: गेल्या काही दिवसांपासून बुलढाणा अर्बन पतसंस्था बंद होणार असल्याचा अफवा पसरत आहेत. बीडमध्ये नागरिक पतसंस्थेतून आपल्या ठेवी बाहेर काढण्यासाठी गर्दी करतानाचे चित्रही दिसले. वडवणीमध्ये नागरिक बँकेबाहेर पहाटेपर्यंत थांबल्याचं बघायला मिळालं. बुलढाणा अर्बन पतसंस्थेबाबत मराठवाड्यातील काही भागांमध्ये पसरवण्यात येत असलेल्या अफवांमुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र या अफवांना कोणताही आधार नसून नागरिकांनी त्यावर विश्वास ठेवू नये, असे स्पष्ट आवाहन बुलढाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी केले आहे. बुलढाणा अर्बनची आर्थिक स्थिती अत्यंत मजबूत असून संस्थेचे सर्व व्यवहार नियमित आणि सुरळीतपणे सुरू असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

Continues below advertisement

आशिया खंडातील सर्वात मोठ्या सहकारी पतसंस्थांपैकी एक म्हणून ओळख असलेल्या बुलढाणा अर्बनकडे सध्या जवळपास 16 हजार कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. यासोबतच संस्थेकडे सुमारे 4 हजार कोटी रुपयांची मालमत्ता असून तब्बल 5 हजार कोटी रुपयांचे सोने सुरक्षित स्वरूपात संस्थेकडे उपलब्ध आहे. त्यामुळे संस्थेच्या आर्थिक स्थैर्यावर कोणताही प्रश्नचिन्ह उपस्थित होण्याचे कारण नाही, असे चांडक यांनी स्पष्ट केले.

मुद्दाम अफवा पसरवण्यात आल्याचा आरोप

कर्नाटकातील एका साखर कारखान्याला कर्ज देणे थांबवल्यानंतर काही हितसंबंधी घटकांकडून मुद्दाम अफवा पसरवण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. या अफवांचा उद्देश संस्थेची प्रतिमा मलीन करणे आणि ठेवीदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणे हा असल्याचे चांडक यांनी नमूद केले. मात्र बुलढाणा अर्बनचे आर्थिक नियोजन, गुंतवणूक धोरण आणि मालमत्तेची ताकद पाहता अशा अफवांचा संस्थेवर कोणताही परिणाम होणार नसल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Continues below advertisement

सर्व शाखांमधील व्यवहार सुरू

बुलढाणा अर्बनचे सर्व शाखांमधील व्यवहार नियमितपणे सुरू असून ठेवीदारांना कोणतीही अडचण येत नाही, असेही त्यांनी सांगितले. संस्थेची पारदर्शक कार्यपद्धती, मजबूत आर्थिक पाया आणि दीर्घकालीन विश्वासार्हता ही बुलढाणा अर्बनची खरी ओळख असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. एबीपी माझाने बँकेच्या अधिकाऱ्यांशी बातचीत केल्यानंतर त्यांनी नागरिकांना शांत राहण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले. बुलढाणा अर्बन ही संस्था ठेवीदारांच्या विश्वासावर उभी असून हा विश्वास अबाधित राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.