बुलढाणा : जागतिक दर्जाचं पर्यटन स्थळ आणि जगातील दुसरं सर्वात मोठं खाऱ्या पाण्याचं सरोवर म्हणून ओळख असलेल्या लोणार सरोवर आणि भोवताली असलेल्या जंगलाला आता संरक्षित व धोकादायक वन्यजीव अभयारण्य म्हणून मान्यता मिळाली आहे. राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या बैठकीनंतर हे जाहीर केलं. यामुळे लोणार सरोवराच्या भोवतालच्या जंगलात असलेले वन्यजीव, पक्षी संरक्षित होणार आहेत. लोणार सरोवराच्या परिसरातील 3.65 चौरस किमी क्षेत्रातील रहिवाशांचे पुनर्वसन करुन हे क्षेत्र आता अभयारण्य म्हणून लवकरच विकसित करणार असल्याचा निर्णय सरकारने या बैठकीत घेतला आहे. त्यामुळे आगामी काळात लोणार सरोवर याठिकाणी जगभरातून पर्यटक आकर्षित होतील आणि संरक्षित वन्यजीवांचाही अभ्यास करतील अशी सरकारला अपेक्षा आहे.


नेत्यांचं पर्यटन आणि लोणारचा विकास
गेल्या अनेक वर्षांपासून लोणार सरोवराचा विकास खुंटला आहे. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात मुख्यमंत्र्यांनी लोणार सरोवराचा दौरा करुन विकासासाठी मोठ्या घोषणाही केल्या होत्या. पण वर्ष उलटून गेल्यावरही लोणार परिसरात कुठलही विकासाच काम सुरु झालं नाही. या वर्षीही तीन महिन्याआधी राज्यपालांनी सुद्धा लोणार सरोवराचा दौरा करुन अनेक मान्यता दिल्या पण कुठल्याही विकासाला चालना मिळाली नाही. म्हणून उशिरा का होईना या परिसराला संरक्षित अभयारण्य म्हणून सरकारकडून मान्यता मिळाल्याने आतातरी लोणारचा विकास होईल का? याकडे जनतेचं लक्ष लागलं आहे.


लोणार सरोवराच्या भवताली आहे मोठं जंगल संपदा
लोणार सरोवर हे जागतिक किर्तीचं पर्यटन केंद्र असल्याने जगभरातून लोणार सरोवराला भेट देण्यासाठी विदेशी पर्यटक येत असतात. लोणार सरोवराभोवती मोठं जंगल आहे आणि या जंगलात रहिवाशांनी अतिक्रमण करुन अधिवास थाटला आहे आणि त्यामुळे या जंगलातील वन्यजीव हे धोक्यात आले आहेत. लोणारच्या भोवताली जंगलात विविध जातीचे पक्षी, दुर्मिळ पक्षी, प्राणी आहेत आणि त्यांचं संरक्षण होणं गरजेचं आहे.


आता लोणार होईल संरक्षित क्षेत्र!
उशिरा का होईना सरकारने लोणार संरक्षित वन्यजीव अभयारण्य घोषित करण्याचा निर्णय घेतल्याने आता या परिसरातील दुर्मिळ प्राणी पक्षी संरक्षित होतील. या भागात अतिक्रमण करुन राहणाऱ्या नागरिकांना मोबदला देऊन सरकार लवकरच स्थलांतरित करणार असल्याने हा परिसर निर्मनुष्य होईल आणि या भागात वन्यजीवांचा अधिवास संरक्षित होणार आहे. त्यामुळे आगामी काळात लोणार हे फक्त सरोवर न राहता वन्यजीव अभयारण्य सुद्धा नावारुपाला येणार आहे. पर्यटक वाढणार आहेत आणि परिसरातील विकासाला चालना सुद्धा मिळणार आहे.


उल्कापातामुळे लोणार सरोवराची निर्मिती
लाखो वर्षांपूर्वी बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराची निर्मिती उल्कापातामुळे झाली. सुमारे 20 लाख टन वजनाची उल्का जोरदार वेगाने पृथ्वीवर आदळली. त्यामुळे पृथ्वीवर 1.8 व्यासाचा आणि 200 मीटर खोलीचा खड्डा तयार झाला. हेच ते लोणार सरोवर. लोणार सरोवर हे बेसॉल्ट खडकातील एकमेव आघाती विवर आहे. हे सुंदर आणि खाऱ्या पाण्याचं अनोखं सरोवर पाहण्यासाठी देशासह परदेशातूनही पर्यटक येतात.