Buldhana Navratri Special 2022 : एखाद्या गावावर ग्रामदेवतेची किती कृपा असावी, याचं उत्तम उदाहरण म्हणजे, खामगांव. जवळच असलेल्या घाटपुरीची श्रीजगदंबा माता हे खामगांवचं ग्रामदैवत. जगदंबा मातेची सदैव कृपा राहिल्यानंच खामगांवचा विकास झाला. येथे सुख, शांती आणि समृद्धी टिकून राहिली, अशी समस्त बुलढाणा जिल्ह्यासह खामगांववासियांची श्रद्धा आहे. केवळ बुलढाणाच नाही, तर आजूबाजूच्या जिल्ह्यातल्या बहुतांश भाविकांची ही कुलदेवता. त्यामुळे भाविकांचा राबता इथं कायमच असतो. मंदिर परिसरात पाय ठेवताच मनाला अपार शांती मिळते, असा भाविकांचा अनुभव आहे.
बुलढाण्यातील (Buldhana) घाटपुरीची ही आहे जगदंबा देवी. माता जमिनीतून प्रकट झाल्याची आख्यायिका सांगितली जाते. शेकडो वर्षांपूर्वी येथील शेतकरी जानराव देशमुख यांच्या शेतात विहिरीचे खोदकाम होत असताना मातेची मूर्ती सापडली. इथे असलेल्या एका मंदिरात तेव्हापासूनच माता विराजमान झाली. मातेच्या मूर्तीच्या कालखंडाचा उल्लेख कुठेही नसला तरीही मूर्ती फार पुरातन असल्याचं बोललं जातं. अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारी देवी म्हणून घाटपुरीची ही माय पंचक्रोशीत नावाजली आहे. जानराव देशमुख यांना मातेची मूर्ती विहिरीच्या खोदकामात सापडली आणि त्यांनी मूर्तीची स्थापना मंदिरात केली. अर्थात त्यावेळी हा परिसर फार आडवळणाचा होता. दोन्ही बाजूला नदी वाहात होती आणि इथे यायला त्रासही बराच होता. पण हळूहळू मातेचा महिमा खामगावच नव्हे तर बुलढाणा जिल्ह्यात पोहचू लागला. परिणामी येथे आता एक विशाल आणि भव्य मंदिर उभं आहे. मंदिरात वर्षभर भाविकांचा राबता असतो. मात्र, नवरात्र काळात फार मोठी यात्रा येथे भरते. जिल्ह्यातूनच नव्हे तर शेजारील मध्यप्रदेश, गुजरात राज्यातूनही 5 लाखांहून अधिक भाविक इथं दर्शन घेत असतात. पहाटे चारपासून देवीच्या नित्यपूजेला सुरुवात होते. शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटेची कुष्मांडा, स्कंदमाता, काव्यासनी, कालरात्री, महागौरी, सिद्धीदात्री, जगदंबा अशी देवीची अवतारात्मक 9 नावं आहेत. जप, हवन, पूजा-अर्चा, रात्री जागरण, गरबा, कुमारी पूजन आणि नवचंडी हवन अशी आई जगदंबेची भक्त सेवा करतात. शेकडो कुटुंबं जगदंबा देवी प्रांगणात येऊन आपला नवस फेडतात.
जगदंबा मातेच्या ट्रस्टने विविध समाजउपयोगी उपक्रम भक्तांसाठी उभारले आहेत. त्यात अत्यल्प दरात भक्तांना राहण्यासाठी इथे धर्मशाळेची व्यवस्था केली गेली आहे. त्याचप्रमाणे या धर्मशाळेचं सभागृह मंगल कार्यासाठी देखील अल्प दारात दिले जातात. इथे विनाशुल्क वैद्यकीय सेवा संस्थान तर्फे दिल्या जातात. दर मंगळवारी आणि शुक्रवारी ही वैद्यकीय सेवा दिली जाते. सध्या लोप पावत चाललेली संस्कृती आणि वेदाची पुरातन व्यवस्था जपण्यासाठी ट्रस्टनं सुरु केली आहे. इथे सनातन संस्कृतीचं शिक्षण देणारी वेदशाळा अगदी लहानपणीच वेद अभ्यासक बालकांना इथे प्रवेश दिला जातो. इथे त्यांना पांडित्य, संस्कृत वेद पठण, धर्मशास्त्र आदींचा अभ्यासक्रम शिकवला जातो. एकूणच उद्योगनगरी आणि विदर्भाची, कापसाची, चांदीची सर्वात मोठी बाजारपेठ अशी ओळख असलेल्या खामगावची नाळ जुळली आहे ही घाटपुरीच्या जगदंबा आईशी.