बुलढाणा : जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील पूर्णा नदीकाठच्या काही गावांमध्ये अचानक नागरिकांना केस गळतीचा त्रास होत आहे. अचानक तीन दिवसातच टक्कल पडण्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे या परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. नागरिकांना अचानक डोक्यात खाजवणे आणि नंतर केस गळती आणि तीन दिवसातच टक्कल पडण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. याबाबत आरोग्य प्रशासनाचे अधिकारी डॉ. अनिल बनकर यांच्याशी संवाद साधला.
आरोग्य विभागातर्फे आवाहन करण्यात आलंय की केस गळतीचे प्रकार आढळल्यास तातडीनं प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा. अशुद्ध पाणी अंघोळीसाठी वापरु नये, गरम पाण्याचा वापर करावा, असं डॉ. अनिल बनकर म्हणाले.
प्राथमिक आरोग्य केंद्र भोनगाव अंतर्गत बोंडगाव, काठोरा आणि कालवड या गावात केस गळतीचे रुग्ण आढळून आलेले आहेत. बोंडगाव येथे 16, काठोरा 13 आणि कालवड येथे 7 केस गळतीचे रुग्ण आढळून आलेले आहेत. या गावांमध्ये सर्वेक्षण करण्यात आलं आहे. आरोग्य विभागाचे वैदकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सहायक, आरोग्य सेवक आणि आशा यांच्या पथकानं सर्वेक्षण केलेलं आहे.
या तीन गावातील पाणी तपासणीसाठी शेगाव येथे पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांना प्राथमिक सूचना देण्यात आल्या आहेत. काही समस्या जाणवल्यास त्वरीत संपर्क साधावा. पुढील कारवाई नक्कीच करु असं डॉ. अनिल बनकर यांनी म्हटलं आहे.
अशुद्ध पाण्याच्या वापरामुळं किंवा नव्या कॉस्मेटिक्सचा वापर केल्यामुळं हा त्रास झाला असावा. एकूण 36 रुग्णांना हा त्रास आहे. ही संख्या वाढत आहे. केस गळतीची समस्या जाणवल्यास प्राथमिक आरोग्य केंद्राकडे संपर्क साधावा. अद्याप याचं अचूक निदान झालेलं नाही. नागरिकांनी अंघोळीसाठी गरम पाण्याचा वापर करावा, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
ज्या नागरिकांची केस गळती झाली त्यांना देखील हे नेमकं कशामुळं झालं हे सांगता आलं नाही. गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून असे प्रकार सुरु झाल्यानं नागरिकांमध्ये घबराट आहे. आरोग्य विभाग याबाबत नेमकी काय पावलं उचलणार हे देखील पाहावं लागेल.
इतर बातम्या :