Buldhana Crime  : स्वतः जिल्हाधिकारी असल्याचे सांगत रेती वाहतुकदारांकडून लाखो रुपयांची रक्कम उकळल्याचा धक्कादायक प्रकार बुलढाण्यात (Buldhana) उघडकीस आला आहे. तहसीलदारांच्या तक्रारीवरून  बुलढाणा जिल्ह्यातील (Buldhana News) अंढेरा पोलीस स्टेशनमध्ये या तोतया जिल्हाधिकारीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. आलिशान गाडीतून आलेल्या या तोतया जिल्हाधिकाऱ्याने रेती वाहतुकदारांकडून लाखोंच्या घरात रक्कम उकळल्याची (Buldhana Crime) प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी देऊळगावराजाच्या  तहसीलदारांनी अंढेरा पोलिसात तक्रार देऊन अज्ञाताविरोधात फौजदारी गुन्हा दखल करण्यात आला आहे. 


स्वतःला जिल्हाधिकारी असल्याचे सांगत उकळले लाखों रुपये 


बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील समृद्धी महामार्गालगतच्या असोला जहांगीर फाट्यापासून ते सिंदखेडराजा या परिसरात एक आलिशान गाडी रात्रीच्या सुमारास फिरत होती. दरम्यान या मार्गावर असलेल्या रेती वाहतुकदारांना या अज्ञात व्यक्तीने अडवून त्यांची विचारपूस करण्यास सुरवात केली. त्यावेळी त्याने स्वतःची ओळख बुलढाणा  जिल्हाधिकारी असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने खंडणी मागण्यास सुरवात केली. अन्यथा कारवाई केली जाईल अशी धमकी देखील दिली. आलिशान गाडी आणि त्याची वर्तणूक बघता ही अज्ञात व्यक्ती खरंच जिल्हाधिकारी असावी, यावर रेती वाहतुकदारांना विश्वास ठेवला. परिणामी नाईलाजास्तव आणि भीतीपोटी उपस्थित रेती वाहतुकदारांनी या तोतया जिल्हाधिकारीला लाखोंच्या घरात रक्कम दिली.


जमावाने केली गाडीची तोडफोड


अपेक्षेप्रमाणे रक्कम मिळाल्याने या तोतया जिल्हाधिकारीने घटनास्थळावरुन पळ काढला. दरम्यान या ठिकाणी उपस्थित नागरिकांना संशय आला. त्यानंतर त्यांनी या अज्ञाताचा पाठलाग सुरू केला. मात्र तोपर्यंत बराच वेळ निघून गेला होता. ही शोधमोहीम सुरू असताना अंढेरा फाटा परिसरात असलेल्या रेणुका हॉटेल परिसरात  या तोतया  जिल्हाधिकारीची गाडी आढळून आली. मात्र तोतया  जिल्हाधिकारीने त्या ठिकाणावरून आधीच पळ ठोकला होता. त्यानंतर उपस्थित जमावाचा राग अनावर झाल्याने उपस्थित जमावाने या गाडीची तोडफोड केली. या घटनेची माहिती पोलिसांना होताच त्यांनी या अज्ञात व्यक्तिीविरोधात गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. या तोतया जिल्हाधिकारीची ओळख पोलिसांना पटली असून दत्तात्रय कायदे असे आरोपीचे नाव आहे.  सध्या पोलीस या आरोपीचा शोध घेत आहे. 


हे ही वाचा