बुलडाणा:  "काबिल बनो, कामयाबी झक मारकर पीछे आएगी" हा अामीर खानच्या 3 इडियट्स या सिनेमातला डायलॉग, बुलडाणाच्या तरुणाने तंतोतंत खरा करुन दाखवला आहे. अमेरिकेतली गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून अभिषेक भराड या तरुणाने बुलडाण्यात यशस्वी शेळीपालन करुन दाखवलं आहे.

तुम्हाला जर अमेरिकेतील नोकरी सोडून बुलडाण्यासारख्या जिल्हायात कोणी शेळीपालन करतोय, असं सांगितलं, तर त्यावर विश्वास बसेल का? पण अभिषेक भराडने हे खरं करुन दाखवलंय.

परदेशातली नोकरी आणि ऐशोआराम सोडून गावात राबण्याचा निर्णय घेणारे तरुण क्वचित बघायला मिळतात. त्या तरुणांपैकी एक म्हणजे डॉ. अभिषेक भराड. बुलडाणा जिल्ह्याच्या साखरखेर्डा गावात हा तरुण शेळीपालन करतोय.

अकोला कृषी विद्यापीठातून पदवीधर झाल्यानंतर अभिषेकनं अमेरिकेच्या लुसीयाना स्टेट विद्यापीठातून पीएचडी केली. त्यानंतर 2 वर्ष कृषी वैज्ञानिक म्हणून काम केलं.

मात्र मातीशी असलेलं नातं तो विसरला नाही. गेल्या वर्षी आपल्या गावात त्यांनी शास्त्रशुद्ध शेळी पालनास सुरुवात केली.

 120 शेळ्यांपासून सुरुवात

या व्यवसायाची सुरुवात त्यांनी 120 शेळ्यांपासून केली. व्यवसायाच्या उभारणीसाठी 12 लाखांची गुंतवणूक त्यांना करावी लागली. आता या शेळ्यांची संख्या दुप्पटीने वाढली आहे. शेळ्यांना वेळापत्रकानुसार योग्य खुराक दिला जातो. अभिषेक शेळ्यांचं बंदिस्त पालन करतो. त्यांच्या स्वच्छेतेची काळजी तो स्वतः घेतो. शेळ्यांचं पाणी पिण्याचं प्रमाण वाढवण्यासाठी पाण्यात गुळाचा वापर  केला जातो. रोगराईपासून दूर ठेवण्यासाठी शेळ्यांना वर्षातून 3 वेळा पशुतज्ञांच्या सल्ल्यानं लसीकरण करण्यात येते.

लेंड्यांपासून गांडूळ खत

शेळ्यांच्या लेंड्यांपासून गांडूळ खताचीही निर्मिती करण्यात येते. या खताची आणि वर्मीवाशची विक्री करण्यात येते. त्याच्या विक्रीतून महिन्याला 10 हजारांचा नफा त्याला मिळतो. शेळी पालनातून दरवर्षी दहा लाखांचं उत्पादन त्याला मिळतं.  यातून सात लाखांचा खर्च वजा जाता तीन लाखांचा वार्षिक नफा अभिषेकला मिळतोय. या पुढील वर्षात उत्पन्नात वाढ होत जाणार आहे.

आफ्रिकन बोर, बीटार्ट, जमुनापारी, सिरोही अशा आठ प्रकारच्या शेळ्या त्याच्याकडे आहेत. हा व्यवसाय करतानाच इतर व्यवसायीकांना शेळ्यांच्या क्रॉस ब्रिडींगसाठीचं प्रशिक्षणही तो देतो.

शेळ्यांच्या खाद्याची व्यवस्था करण्यासाठी अभिषेकनं 6 एकर शेत भाड्यानं घेतलंय. त्यात मका आणि वेगवेगळ्या प्रकारच्या चारा पिकांची लागवड त्यानं केली आहे. आपल्या उच्चशिक्षणाचा वापर नोकरीमध्ये न करता अभिषेकनं व्यवसायाची कास धरली. फक्त स्वतःपुरता त्याचा वापर न करता तो या शिक्षणाचा प्रसार देखील करतोय. इतर उच्च शिक्षीत तरुणांसाठी अभिषेकनं एक नवा लाईफ गोल सेट केलाय, असं म्हणायला हरकत नाही.

VIDEO: