Economic Survey 2022-23 :  अर्थसंकल्पापूर्वी  (Budget 2023) आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आर्थिक सर्वेक्षण अहवाल संसदेत (Budget Session) मांडला. देशाच्या कृषी क्षेत्राने (Agriculture Sector) सहा वर्षांत सरासरी वार्षिक 4.6 टक्के वाढ नोंदवली असल्याचे सर्वेक्षण अहवालात नमूद करण्यात आले आहे. देशाच्या सर्वांगीण विकासात आणि अन्नसुरक्षेत कृषी आणि त्याच्याशी संबंधित घटकांनी मोठी जबाबदारी पार पाडली असल्याचे आर्थिक सर्वेक्षण (Economic Survey) अहवालात नमूद करण्यात आले. मागील काही वर्षात भारत कृषी उत्पादनांचा प्रमुख निर्यातदार देश म्हणून नावारुपास आला असल्याचेही अहवालात म्हटले. वर्ष 2021-22 मध्ये निर्यात ही 50.2 अब्ज डॉलर इतक्या विक्रमी स्तरावर पोहचली. 


कृषी क्षेत्रातील वाढीचे आणि भरभराटीचे श्रेय सरकारने पीक आणि पशुधन उत्पादकता वाढवण्यासाठी केलेल्या उपाययोजनांना दिले आहे. शेतमालाला किमान हमी भावाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पिकांना चांगला परतावा मिळण्याची खात्री देणे, पिकांमधील विविधता आणण्यासाठी हस्तक्षेप करणे, कर्जाची उपलब्धता, यांत्रिकीकरणाची सुविधा, फलोत्पादन आणि सेंद्रिय शेती यामुळेही कृषी क्षेत्रात भरभराट झाली असल्याचे सर्वेक्षणात म्हटले आहे.


वर्ष 2018-19 पासून खरीप, रब्बी आणि अन्य व्यावसायिक पिकांसाठी किमान हमी भाव हा अखिल भारतीय स्तरावरील सरासरी उत्पादन खर्चाच्या किमान 50 टक्क्यांनी वाढवत असल्याचे सरकारने म्हटले. 


सरकारने 2022-23 मध्ये कृषी कर्ज प्रवाहात 18.5 लाख कोटी रुपयांचे लक्ष्य ठेवले आहे. सरकारने दरवर्षी हे उद्दिष्ट सातत्याने वाढवले ​​आहे आणि गेली अनेक वर्षे सातत्याने निर्धारित केलेले उद्दिष्ट ओलांडण्यातही सरकारला यश आले आहे. 2021-22 मध्ये ते 16.5 लाख कोटी रुपयांच्या उद्दिष्टापेक्षा सुमारे 13 टक्के अधिक होते.


2023-24 मध्ये सेवा क्षेत्रात 9.1 टक्क्यांची वाढ अपेक्षित


2022-23 या वर्षात सेवा क्षेत्राची वाढ खूप चांगली झाली आहे. सेवा क्षेत्राने 8.4 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. पुढील वर्षी म्हणजे 2023-24 मध्ये सेवा क्षेत्रात 9.1 टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. 


कोरोनामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई पूर्ण झाली आहे, म्हणजेच कोरोनाच्या काळात झालेली पिछेहाट यावर्षी भरुन निघाल्याचा दावाही संसदेत सादर केलेल्या आर्थिक सर्वेक्षणातून केंद्रीय अर्थमंत्र्यांनी केला आहे.


सेवा क्षेत्राला बँकांकडून होणाऱ्या वित्तपुरवठ्यातही सकारात्मक वाढ झाली आहे. ही वाढ तब्बल 21 टक्क्यांची आहे. वैद्यकीय पर्यटन म्हणजे वैद्यकीय उपचारांसाठी जगभरातून भारतात येणाऱ्यांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. चांगल्या दर्जाची वैद्यकीय सेवा देण्याऱ्या जगातील 46 देशांमध्ये भारताचा क्रमांक दहावा असल्याची माहिती आर्थिक अहवालात नोंदवण्यात आली आहे.