यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली. शिवसेनेत मंत्रीपदावरुन सुरु असलेल्या नाराजीवर बोलताना ते म्हणाले की, चंद्रकांत खैरेंच्या वेदनेनंतर आज अब्दुल सत्तार मातोश्रीची पायरी चढले नसावेत तर लिफ्टने गेले असावेत. पाच वर्षे सत्तेच्या उपाशींना जे ताटात आलं ते गोड मानायचं अशी वेळ आज काँग्रेसवर आल्याची या खातेवाटपातून दिसतंय असंही ते म्हणाले.
मुंगीला लाजवणारा आणि कासवने आत्महत्या करावी अशा मंद गतीचं हे सरकार आहे, असंही ते म्हणाले. कोणी रुसतोय, कोणी फुगतोय, कोणी राजीनामा देतोय तर कोणी लोटांगण यात्रा काढतोय. या सरकारचा आधार किस्सा खुर्चीचा आहे. शिवसेनेनं तर मुख्यमंत्री पदासाठी पक्षाचा विचार जमिनीत गाडून टाकला आहे, असंही सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
हेही वाचा- विश्वासघातानं बनलेलं सरकार सहा महिनेसुद्धा टिकणार नाही; देवेंद्र फडणवीसांचं भाकित
आता विद्यार्थ्यांसाठी "तीन तिघाडा, काम बिघाडा" या म्हणीचं आदर्शन उदाहरण म्हणजे हे सरकार आहे. अशाच पद्धतीने काम सुरू राहिलं तर इंग्रजी वर्षात आलेलं सरकार मराठी वर्षांत म्हणजे गुढी पाडव्यापर्यंत राहणार नाही. बीज बोओगे बबूल के तो बेर कहां से पाओगे? ज्याचा आधार बेईमानीचा ते सरकार टिकू शकत नाही, असंही ते म्हणाले.
अजित पवार आमचे हितचिंतक हे अवघ्या महाराष्ट्राने पाहिलंय पण आता मात्र त्यांना दुसऱ्याच्या हितांची चिंता करावी लागेल यासाठी शुभेच्छा आहेत. त्यांच्या हातून चांगलं काम घडे, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे का? पक्षांच्या तिजोरीत खडखडाट आहे हे लवकरच कळेल, असंही ते म्हणाले.
हेही वाचा- चाळीत राहणाऱ्या मुलाला गृहनिर्माण मंत्री केलं, हे फक्त शरद पवारच करू शकतात : जितेंद्र आव्हाड