नागपूर : शिवसेनेने भारतीय जनता पक्षासोबत असलेली अनेक वर्षांपासूनची युती तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केली. या दोन पक्षांना सोबत घेत महाविकास आघाडी स्थापन करुन राज्यात सत्ता स्थापन केली. त्यामुळे देवेंद्र फडणवीस सातत्याने शिवसेनेवर आणि महाविकास आघाडीवर टीका करत आहेत. शिवसेनेने भाजपची साथ सोडल्याने फडणवीस दुःखी झाले आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
सध्या राज्यभरात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका सुरु आहेत. देवेंद्र फडणवीस या निवडणुकींच्या प्रचारार्थ सभा घेत आहेत. या सभांमध्ये फडणवीस शिवसेना आणि सरकारवर टीका करत आहेत. आज फडणवीसांनी दगडपारवा आणि चोहट्टा बाजार येथे सभा घेतली होती. या सभेत फडणवीस म्हणाले की, राज्यात तयार झालेलं सरकार विश्वासघात आणि बेईमानीचं सरकार आहे.
फडणवीस म्हणाले की, शिवसेना स्वार्थासाठी कुठेही जाऊ शकते, कुठेही स्थायिक होऊ शकते, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाऊन शिवसेनेने त्यांची बेईमानी वृत्ती दाखवली आहे. बेईमानानी आणि विश्वासघाताने बनलेलं हे सरकार सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ टिकणार नाही. मलाईदार खात्यांसाठी त्यांची आपसात भांडणं सुरु आहेत. अब्दुल सत्तारांपासून महाविकास आघाडीला गळती सुरु झाली आहे. ही गळती कुठपर्यंत जाईल, हे माहित नाही.
फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने बनवलेलं हे सरकार फसवं आहे. त्यांनी जाहीर केलेली कर्जमाफी फसवी आहे. 12 कोटी लोकसंख्या असलेल्या या राज्यात दररोज केवळ 18 हजार नागरिकांना शिवभोजन मिळणार आहे. सरकारचे सर्व निर्णय हे लोकांची फसवणूक करणारे आहेत. त्यामुळे हे सरकार फार काळ टिकणार नाही.
फडणवीस म्हणाले की, निवडणूक काळात शिवसेना सातत्याने मागणी करत होती की, अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 25 हजार रुपये हेक्टरी मदत देण्यात यावी, तर 50 हजार रुपये हेक्टरी मदतीची मागणी काँग्रेस-राष्ट्रवादीकडून केली जात होती. परंतु हेच लोक आता सत्तेत बसल्यानंतर शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळेना.