पालघर : लहानपणी चाळीत राहणाऱ्या मुलाला चाळींचा विकास करण्याचं मंत्रीपद पद मिळालं आहे. त्यामुळे या सगळ्या चाळींचा कायापालट करणार असल्याचा विश्वास गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला आहे. शरद पवार यांच्याइतका सामाजिक भान असलेला नेता दुसरा महाराष्ट्रात आहे असं मला वाटत नाही, असं सांगत जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या चाळीतल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला.

पालघर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी जितेंद्र आव्हाड यांचं नाव समोर येत असून जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळाल्यास येथील भौगोलिक आणि नैसर्गिक साधनसंपत्तीच्या जोरावर या जिल्ह्याचा कायापालट करेन असा विश्वास आव्हाड यांनी व्यक्त केला आहे.

जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने नुकतेच गृहनिर्माण खात मिळालेले राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी तलासरी राष्ट्रवादीच्या कार्यालयात कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यावेळी आव्हाड यांनी विष्णू सवरांसह माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर बोचरी टीका केली. चाळीत राहणाऱ्या मुलाला गृहनिर्माण मंत्री केलं हे फक्त शरद पवारच करू शकता असे म्हणत पवार यांच्या माध्यमातून नियतीने मला ही संधी दिली त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या मूलभूत प्रश्न लवकरात लवकर सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

आव्हाड म्हणाले की, पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री पद हे राष्ट्रवादीकडे असेल असे संकेत दिले. त्यामुळे माजी पालकमंत्री सवरा जिल्ह्यातील गावात मागील पाच वर्षात जितके फिरले नाहीत त्यापेक्षा जास्त गावं आपण फिरून दाखवू असं आश्वासन देत पालघर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत सत्ता आली तर अधिकचा निधी आणून विकास करू असे सांगितले. यावेळी माजी मुख्यमंत्री फडणवीस आज जिल्ह्यात फिरतात त्यापेक्षा मागील पाच वर्षे आढावा घेतला असता तर भलं झालं असतं असं ते म्हणाले.

72 टक्के निधी परत पाठवणार हा कर्तृत्ववान मंत्री कोण? त्यांचा सत्कार देखील व्हायला हवा असे विष्णू सवरा यांचं नाव न घेता टोला हाणला. सवरा यांच्या घरासमोरील रस्ता देखील आपण त्यांचा सोयी करीता करू अशी टीका आव्हाड यांनी केली. पूर्वीच्या मंत्र्यांनी काही केलं नाही म्हणून पालकमंत्री म्हणून मला संधी मिळाली तर सागरी, नागरी, डोंगरी असा निसर्गाने वरदान दिलेल्या प्रदेशाचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही, असं ते म्हणाले.

प्रदूषणमुक्त प्रदेश असल्याने मेडिकल हब म्हणून ही विकास साधता येईल का यासाठी प्रयत्न करून पर्यटनातून आदिवासींचा विकास साधण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. मी स्वतः ह्या भागात विकासासाठी काम करणार असून मी पवार साहेबांच्या व्यतिरिक्त कुणाचंही ऐकत नाही किंवा कुणाच्या दबावात येत नाही, असंही ते म्हणाले.