मुंबई: भाजपच्या ज्येष्ठ नेत्या जयवंतीबेन मेहता यांचं वयाच्या 78व्या वर्षी निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून जयवंतीबेन मेहता आजारी होत्या. काल मध्यरात्री त्यांनी दीड वाजण्याच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला.

जयवंतीबेन मेहता यांनी 1962 मध्ये सक्रीय राजकारणात प्रवेश केला. यानंतर 1968 मध्ये त्या मुंबई महापालिकेवर पहिल्यांदा निवडून गेल्या.  जवळपास 10 वर्षे त्या मुंबई महापालिकेत होत्या.

आणीबाणीच्या काळात त्या 19 महिने बंदीवासात होत्या. त्यानंतर 1978 साली त्या पहिल्यांदा आमदार झाल्या. 1980 मध्ये त्यांची भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारीणीवर नियुक्ती झाली. 1989 मध्ये त्या पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेल्या होत्या. लोकसभेत त्या दक्षिण-मुंबई मतदारसंघाचं नेतृत्व करीत होत्या.

1996 ते 1999 च्याकाळात वाजपेयी सरकारमध्ये केंद्रीय उर्जाराज्यमंत्री पदही भूषवलं. यासह भाजपची अनेक महत्वाच्या पदांवर जयवंतीबेन मेहता यांनी स्वत:ची छाप पाडली.

2004 सालातील लोकसभा निवडणुकीत त्यांना काँग्रेसच्या मुरली देवरा यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर, त्यांनी राजकारणातून संन्यास घेतला.

त्यांच्या निधनावर भाजपच्या सर्व वरिष्ठ नेत्यांसह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शोक व्यक्त केला आहे.