सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदारसंघात म्हणजे बल्लारपूर मतदारसंघात हंसराज अहिर यांना लोकसभा निवडणुकीत तब्बल 31 हजारांची पिछाडी मिळाली होती. त्यामुळे हंसराज अहिर यांनी जाहिरातीच्या माध्यमातून सुधीर मुनगंटीवार यांच्यावर निशाणा साधलाय का? असा प्रश्न विचारला जात आहे.
चंद्रपूर : एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांच्यानंतर आता भाजपातील अजून एक मोठा नेता नाराज असल्याचं समोर आलं आहे. वर्तमानपत्रातील एका जाहिरातीवरुन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर नाराज असल्याची चर्चा सुरु झाली आहे. अहिर यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना 'पक्षनिष्ठ भाजप कार्यकर्ते, मतदारांसाठी माहिती, चिंतन, चिंता आणि सावधानतेसाठी' अशा मथळ्याखाली एक जाहिरात दिली आहे. लोकसभा निवडणुकीआधी संपूर्ण चंद्रपूर मतदारसंघ भाजपच्या ताब्यात होता. 2019च्या लोकसभा निवडणुकीत चार मतदारसंघात कशी पिछाडी मिळाली, याचं ग्राफिक्स देण्यात आलं आहे. त्यामुळं या जाहिरातीच्या माध्यमातून अहिरांनी सुधीर मुनगंटीवारांवर निशाणा साधलाय का? असा प्रश्न विचारला जात आहे. या जाहिरातीत चंद्रपूर मतदारसंघात भाजपचे पाच आमदार, जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि अनेक नगरपरिषदा भाजपच्या ताब्यात असतांना भाजपचा पराभव का झाला? असा प्रश्न विचारण्यात आला आहे. विशेष म्हणजे हंसराज अहिर आणि माजी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मधील सुप्त राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदारसंघात म्हणजे बल्लारपूर मतदारसंघात हंसराज अहिर यांना लोकसभा निवडणुकीत तब्बल 31 हजारांची पिछाडी मिळाली होती. त्यामुळे हंसराज अहिर यांनी जाहिरातीच्या माध्यमातून सुधीर मुनगंटीवार यांच्यावर निशाणा साधलाय का? असा प्रश्न विचारला जात आहे. विशेष म्हणजे या जाहिरातीत भाजपच्या अन्य नेत्यांचे फोटो असले तरी सुधीर मुनगंटीवार यांचा फोटो वगळण्यात आला आहे.
दरम्यान या जाहिरातीबद्दल बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, यामध्ये कुठलीही टीका केलेली नाही. कार्यकर्त्यांनी जास्त काम केलं पाहिजे या हेतूनं याकडे पाहिलं पाहिजे. अहिर यांची अशी भावना असल्याचं कारण नाही. कारण ते स्वत: देशाचे गृहाराज्यमंत्री होते. ज्या ठिकाणी पराभव झाला त्याठिकाणी माझा काहीही संबंध नव्हता. मी महाराष्ट्राकडे लक्ष द्यायचो. पालकमंत्री म्हणून मी विकासाकडे लक्ष द्यायचो. अहिरही स्वत: मंत्री होते ना? असा सवाल त्यांनी केला. पक्षांतर्गतल्या गोष्टी अशा जाहिर करू नयेत, असेही ते म्हणाले.