नवी दिल्ली : देशात मृत्यू इतका स्वस्त झालाय की त्याला रस्ते, लोकल, चेंगराचेंगरी अशी कुठलंही कारणं पुरतात. शिवाय यात निर्ढावलेल्या व्यवस्थेकडून वयोगटाचाही कुठला भेद दिसत नाही. राजस्थानमध्ये एका महिन्यात तब्बल 100 बालकांचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला आहे. या घटनेवरुन जोरदार राजकारणही सुरु झालं आहे.


राजस्थानमधल्या हॉस्पिटलमध्ये एका महिन्यांत तब्बल 100 बालकांचा मृत्यू झाला आहे. कोटामधल्या जे के लोन या हॉस्पिटलमध्ये गेल्या दोन दिवसांत येथे 8 बालकांचा मृत्यू झाला आहे. त्याआधीही 23-24 डिसेंबर या दोन दिवसांत येथे दहा बालकं दगावली होती. राहुल, प्रियंका गांधी यांना भेट देण्यासाठी कोटा हे काही दिल्लीपासून फार लांब नाही असा टोला भाजपचे सोशल मीडिया प्रमुख अमित मालवीय यांनी लगावला आहे. भाजपकडून टीका झाल्यानंतर काँग्रेसचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी त्याबद्दल ट्विटरवर स्पष्टीकरण दिलं आहे.


अशोक गेहलोत ट्वीटमध्ये म्हणाले, कोटा येथील जेके लोन हॉस्पिटलमध्ये आजारी बालकांच्या मृत्यूबद्दल सरकार संवेदनशील आहे. यावर राजकारण होऊ नये. कोटाच्या  रुग्णालयात बालमृत्यू सातत्याने कमी होत आहेत. आम्ही ते आणखी कमी करण्याचा प्रयत्न करू. माता व मुले निरोगी राहणे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे

उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री बनल्यानंतर त्यांच्याच गोरखपूर मतदारसंघात ऑक्सिजन पुरवठयाअभावी बालकं दगावल्याची घटना समोर आली होती. त्यावेळी योगी आदित्यनाथ यांच्या कारभारावर विरोधकांनी जोरदार टीका केली होती. आता काँग्रेसच्या सरकारमध्येही बालकांचा मृत्यू होत असल्यानं त्यावरुन अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.

राजस्थानमध्ये इतक्या मोठया प्रमाणात बालकं दगावल्यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनीही याची गंभीरपणे दखल घेतली आहे. त्यांनी तातडीनं याबाबतची नाराजी सरकारला कळवली आहे. शिवाय राजस्थानचे प्रभारी अविनाश पांडे यांनाही चौकशीसाठी पाचारण केलं.

काही बालकं ही जन्मताच वजनानं कमी असल्यानं दगावल्याचं तोकडं स्पष्टीकरणही देण्यात येत आहे. पण मुळात गर्भवती महिलांसाठी अनेक योजना सुरु असताना त्या गरजवंतांपर्यंत पोहचत नाहीत का? असाही सवाल त्यातून उपस्थित होत आहे. त्यामुळेच आता इतक्या संवेदनशील विषयात तरी सरकारं कारणं बाजूला ठेवत तातडीनं गंभीर कार्यवाही सुरु होईल हीच अपेक्षा आहे.