Pik Vima : पीक विमा (Pik Vima) योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचा उद्या (3 ऑगस्ट) शेवटचा दिवस आहे. त्यामुळं ज्या शेतकऱ्यांनी (Farmers) अर्ज केला नाही, त्या शेतकऱ्यांनी त्वरीत अर्ज भरावा असं आवाहन कृषी विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे. दरम्यान, उद्या अर्ज करण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळं ठिकठिकाणी सेतू केंद्रावर शेतकऱ्यांनी गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळालं. दरम्यान, भंडारा जिह्यातील दोन लाख शेतकऱ्यांनी पीक विमा काढला  आहे. पीक विम्यासाठी अर्ज करण्याची मुदत वाढवल्यामुळं भंडारा जिल्ह्यातील 40 हजारांच्या वर शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. मुदत वाढवली नसती तर पीक विम्यापासून 40 हजार शेतकरी वंचित राहणार होते.


भंडारा जिह्यातील दोन लाख शेतकऱ्यांनी काढला पीक विमा 


खरीप हंगामातील पिकांचा विमा काढण्याची मुदत संपल्यानं शेकडो शेतकरी पीक विमा योजनेपासून वंचित राहणार होते. भंडारा जिह्यातील सुमारे दोन लाख शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. 40 हजारांच्यावर शेतकरी यापासून वंचित राहणार होते. पण पीक विमा अर्ज करण्याची तारीख वाढवली आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. राज्य सरकारच्या विनंतीवरुन केंद्र सरकारनं पीक विम्याची मुदत तीन दिवसांनी वाढवली आहे. 31 जुलै ही पीक विम्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख होती. मात्र, यामध्ये बदल करुन तीन ऑगस्टपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. 


सेतू सेवा केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी


पीक विमा अर्ज करण्याचा उद्या शेवटचा दिवस असून या योजनेचा लाभ मिळावा यासाठी आता सेतू सेवा केंद्रावर शेतकऱ्यांनी गर्दी केल्याचं चित्र बघायला मिळत आहे. यावर्षी पंतप्रधान पीक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक विमा कवच देण्यात आलं आहे. यापूर्वी पिक विम्याच्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागत होती. मात्र, पिकाला संरक्षण मिळावे, यासाठी सरकारने पीक विमा योजना सुरु केली आहे. पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना पिकासाठी संरक्षित असणारी रक्कम मिळणार आहे.


एक रुपयात पीक विमा भरण्यास शेतकऱ्यांचा प्रतिसाद : कृषीमंत्री


शेतकरी बांधवांनी या खरीप हंगामात एक रुपयात पीक विमा (Pik Vima) भरण्यास उत्तम प्रतिसाद दिला असल्याची माहिती राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे (Agriculture Minister Dhananjay Munde) यांनी दिली. आतापर्यंत दीड कोटी पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी विमा अर्ज भरले आहेत. तांत्रिक कारणांनी कोणत्याही शेतकऱ्यांचा विमा भरणे मागे राहू नये, यासाठी ऑनलाइन विमा अर्ज करण्यासाठी तीन दिवसांची मुदत वाढ देण्यात आली असल्याचे मुंडे म्हणाले. उर्वरित शेतकरी बांधवांनी आपला विमा अर्ज तीन ऑगस्टच्या आत ऑनलाइन भरुन घ्यावा असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केलं. 


पीक विमा भरण्यासाठीची वेबसाईट सतत हँग होत असल्याने शेतकऱ्यांना दिवस-दिवस सीएससी सेंटरवर बसून राहावं लागत होतं. अशातच पिक विमा भरण्यासाठी देण्यात आलेली शेवटची तारीख जवळ येत चालली होती. याच पार्श्वभूमीवर अनेक शेतकऱ्यांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी या प्रकरणात विशेष लक्ष देऊन पिक विमा भरण्यासाठी वेबसाईट सुरळीत करून पीक विमा भरण्यासाठी मुदत वाढ देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. बळीराजाच्या याच मागणीचा विचार करुन राज्य सरकारनं तशी विनंती केंद्र सरकारकडे केली होती. राज्याची हीच विनंती मान्य करत आता पिक विमा भरण्यासाठी केंद्राकडून 3 ऑगस्टपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Dhananjay Munde : आत्तापर्यंत दीड कोटीहून अधिक शेतकऱ्यांनी पीक विमा अर्ज भरले, कृषीमंत्री धनंजय मुंडेंची माहिती