Ashish Deshmukh : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी भाजपमध्ये यावं अशी खुली ऑफर भाजप नेते आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी दिली आहे. विदर्भातील शेतकऱ्यांसाठी झटणारे नेते म्हणून रविकांत तुपकर यांची ओळख आहे. शेतकरी हितासाठी कमीलीची कामं करणारा भाजप पक्ष आहे. त्यामुळं तुपकरांनी भाजपमध्ये प्रवेश करावा असं देशमुखांनी म्हटलंय. आशिष देशमुख हे भंडाऱ्यात आले हते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
रविकांत तुपकर यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या विद्यमान नेत्यांवर थेट नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळं स्वाभिमानीत बहुजन समाजाचा स्वाभिमान दुखावला जात असल्याची शेतकऱ्यांची भावना असल्याचे आशिष देशमुख म्हणाले. त्यामुळं तुपकरांनी भाजपमध्ये प्रवेश करावा अशी ऑफर देशमुख यांनी दिली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी परवा कार्यकर्त्यांची तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. यामुळेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेत उभी फूट पडते की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांच्याकडून रविकांत तुपकर यांचे नेतृत्व दाबण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा सुरू आहेत. याला खुद्द रविकांत तुपकर यांनी त्याला दुजोरा दिला आहे. आपला केसाने गळा कापण्याचा प्रयत्न होत असल्याचे तुपकर म्हणालेत. त्यामुळं आता तुपकर स्वाभिमानीत राहणार की वेगळा पर्याय निवडणार याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे. अशातच आता आशिष देशमुखांनी त्यांना भाजपमध्ये येण्याची खुली ऑफर दिली आहे. याबाबत तुपकर नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.
वडेट्टीवार आल्यानं महाराष्ट्रातील नानागिरी संपुष्टात येणार
काँग्रेसचा 50, 60 वर्षाचा अनुभव बघता एकाच प्रदेशात दोन महत्वाची पद ठेवली जात नाहीत. पण विदर्भातीलचं विजय वडेट्टीवार यांना पक्ष श्रेष्ठीनं विरोधी पक्ष नेतेपदाची जबाबदारी दिली आहे. वडेट्टीवार आल्यानं महाराष्ट्रातील नानागिरी संपुष्टात येणार असल्याचा टोला देशमुखांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांना लगावला. भंडारा आणि गोंदियातील काँग्रेसचे कार्यकर्ते सैरवैर झाले आहेत. प्रफुल्ल पटेल हे आता भाजपसोबत आले असून, येत्या काही दिवसात भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातून नानागिरी संपुष्टात येणार असल्याचे देशमुख म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: