Bhandara News: भंडारा जिल्हा परिषदेत (Bhandara jilha parishad) भाजपशी (BJP) बंडखोरी केलेल्या सदस्यांनी पुन्हा भाजपमध्ये घरवापसी केली आहे. त्यामुळं या सदस्यांविरोधात दाखल केलेली अपात्रतेची कारवाईची याचिकाच भाजपचे गटनेते विनोद बांते यांनी मागे घेण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. त्यामुळं आता या सदस्यांवरील अपात्रतेची कारवाई टळणार आहे. भाजपला जिल्हा परिषदेत सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपच्या पाच सदस्यांनी काँग्रेससोबत हातमिळवणी केली होती. यावर भाजपचे गटनेते विनोद बांते यांनी पक्षाचा व्हीप बजावला होता. पाच सदस्यांनी तो झुगारून काँग्रेसला मदत करुन पद मिळवल्याप्रकरणी पाच सदस्यांवर अपात्रतेची कारवाई करावी, अशी याचिका बांते यांनी केली होती.


तब्बल सव्वा वर्षानंतर आता अपात्रतेची कारवाई होणार असल्याचं लक्षात येताच काँग्रेससोबत गेलेल्या भाजपच्या बंडखोर सदस्यांनी भाजपात गृहवापसी केली आहे. त्यामुळं या सदस्यांवर दाखल केलेली अपात्रतेची कारवाईची याचिकाच भाजपचे गटनेते विनोद बांते यांनी मागे घेण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. त्यामुळं या सदस्यांवर होणारी कारवाई टळणार आहे.  


अशी मिळविली सत्ता....


52 सदस्य संख्या असलेल्या भंडारा जिल्हा परिषदेत सर्वाधिक 21 सदस्य काँग्रेसचे निवडून आले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 13, भाजपचे 12, अपक्ष 4, शिवसेना 1, बहुजन समाज पक्ष 1 अशी पक्षीय बलाबल आहे. भाजपच्या उमेदवारीवर निवडून आलेल्या भाजपमधीलच पाच सदस्यांनी बंडखोरी करीत काँग्रेस सोबत हातमिळवणी करुन जिल्हा परिषदेवर सत्ता मिळवली. या सत्तेत भाजपच्या बंडखोर सदस्यांमध्ये संदीप ताले यांना उपाध्यक्षपद तर अपक्ष असलेल्या राजेश सेलोकर यांना सभापतीपद मिळाले. 


भाजपनेचं रोखल भाजपला सत्तेपासून...


जिल्हा परिषदेचे 12 सदस्य भाजपचे निवडून आल्यानं त्यांनी काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेससोबत हातमिळवणी केली. मात्र, भाजपचे माजी आमदार चरण वाघमारे यांना भाजपचे माजी राज्यमंत्री डॉ परीणय फुके यांचे नेतृत्व मान्य नसल्यानं त्यांच्या पाच निष्ठावान सदस्यांसोबत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेससोबत हातमिळवणी केली. 


सत्तेसाठी भाजपमध्येच दोन गट दोन गटनेते....


भाजपचे माजी आमदार चरण वाघमारे आणि माजी राज्यमंत्री परिणय फुके या दोघांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भाजपमध्येच दोन वेगवेगळे गट पडले. भाजपचे 12 सदस्य निवडून आले असले तरी परिणय फुके यांच्या गटात 7 सदस्य तर चरण वाघमारे यांच्या गटात 5 सदस्य सहभागी झाले. भाजपच्या परीणय फुके गटाचे गटनेते विनोद बांते तर, चरण वाघमारे गटाचे गटनेते संदीप ताले या दोघांनीही अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीसाठी व्हीप बजावला. 


अध्यक्षपदाच्या निवडी दरम्यान सभागृहात भाजपमध्येच राडा....


भाजपमध्ये अंतर्गत बंडखोरी झाल्याने दोन्ही गटनेत्याने बजावलेल्या व्हीपनंतर निवडणूक प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या सभागृहात सुरू झाली. दरम्यान, भाजपच्या दोन्ही गटात वाद सुरू झाला, हा वाद हाणामारीपर्यंत पोहोचला आणि एकमेकांचे सभागृहातच कपडे फाडण्यापर्यंतची मजल सभागृहात रंगली. 


उपाध्यक्षपदाची निवडणूक भाजप विरुद्ध भाजपमध्येच झाली....


सर्वात मोठा पक्ष म्हणून जिल्हा परिषदमध्ये काँग्रेस निवडून आल्यानंतर त्यांना सत्तेत सहभागी होण्यासाठी केवळ 6 सदस्यांची गरज होती. त्यांनी भाजपचे चरण वाघमारे यांच्या 5 आणि एका अपक्षाला हाताशी पकडून काँग्रेसने सत्तेत सहभागी होण्याचे ठरवले. सभागृहात काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या उमेदवाराविरुद्ध राष्ट्रवादीने उमेदवार दिला. मात्र, खरी लढाई झाली ती उपाध्यक्षपदासाठी, यात भाजप विरुद्ध भाजप अशीच लढाई रंगली. भाजपच्या फूके गटाने प्रियंका बोरकर यांना तर, चरण वाघमारे गटाने संदीप ताले यांना उभं केलं. यात संदीप ताले हे विजय झाले.


13 महिन्यानंतर मनोमिलन


13 महिन्यापूर्वी भंडारा जिल्हा परिषदेत सत्तानाट्य बघायला मिळालं होतं. यावेळी सदस्यांमध्ये झालेल्या झटापटीत एकमेकांच्या विरोधात पोलिसात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. मात्र, आता ज्या सदस्यांनी बंडखोरी केली ते पुन्हा पक्षात परतले आहेत. त्यामुळं त्यांच्यावर होणाऱ्या अपात्रतेच्या कारवाईसह पोलीस कारवाईच्या ही तक्रारी आता मागे घेण्यात येत आहे. विरोधात असलेल्या भाजपकडे आता पाच सदस्य परत आल्यानं बहुमताचा आकडा असला तरी, सत्तेतील काँग्रेसवर अविश्वास ठराव आणता येईल असा आकडा अद्याप जूडलेला नाही. त्यामुळं काँग्रेसच्या सत्तेला सध्या तरी धोका नाही.


महत्त्वाच्या बातम्या:


Bhandara Rain : भंडारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला, नदी नाले दुथडी भरुन लागले वाहू