भंडारा : भाजपचे खासदार सुनील मेंढे यांच्या वतीने भंडारा जिल्ह्यातील सातही तालुक्यात दिव्यांगांना साहित्य वाटप कार्यक्रम आणि जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले. या जनता दरबारातून नागरिकांच्या प्रलंबित समस्या सोडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. खुद्द खासदार जनता दरबारात नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करीत असताना काही मुजोर कर्मचारी मात्र त्यांना उडवाउडवीची उत्तरे देत होती. मग काय! शांत सुस्वभावी आणि नेहमी चेहऱ्यावर स्मितहास्य ठेवणाऱ्या खासदारांचा संताप अनावर झाला आणि मुजोरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा चांगलाच क्लास घेतला. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी किंबहुना त्यांना होणाऱ्या त्रासाची जाणं ठेवून नागरिकांचे प्रलंबित प्रश्न तत्काळ सुटावे यासाठी खासदारांचे हे रूप पहिल्यांदाच नागरिकांनी अनुभवले. किंबहुना यात अनेकांच्या प्रश्नांची उकल झाली.अनेकांना न्याय मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान दिसू लागले.
भंडारा जिल्ह्यातील मोहाडी इथं दिव्यांगांना साहित्य वाटप व जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. भंडारा जिल्ह्यात सात तालुके असून प्रत्येक तालुक्यातील नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा हा प्रयत्न खासदारांनी केला. नागरिकांच्या समस्या जाणून घेत समस्या ऑन द स्पॉट सोडवता याव्यात, हा उद्देश ठेवून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बोलावण्यात आलं होते. मात्र, यात काही कर्मचाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याने खासदार सुनील मेंढे चांगलेच संतप्त झाले
वन जमिनीचा मुद्दा आणि लाव रे त्यांना फोनचा आदेश
मोहाडी तालुक्यातील एका गावातील वन हक्क जमिनीच्या मुद्द्यावरून एका ग्रामस्थाने जनता दरबारात खासदारांकडे कैफियत मांडली.यावेळी खासदार मेंढे यांनी यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यासंबंधात उत्तर देण्यासाठी बोलवले. मात्र, वरिष्ठ अधिकारी न येता तिथे कनिष्ठ अधिकारी उत्तर देत होते.यावेळी माहिती अभ्यासपूर्वक नसून उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे लक्षात येताच अगदी शांत असणारे खासदार सुनील मेंढे यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी वन कर्मचाऱ्याला चांगलेच धारेवर धरले. यावेळी वरिष्ठ अधिकारी हजार नसल्याने संतप्त खासदारांनी 'लाव रे त्यांना फोन...' म्हणत आपल्या स्विय सहाय्यकाला फर्मान सोडले, आणि सभागृहात शांतता पसरली. काही काळानंतर त्या समस्येवर तातडीने उपाययोजना करून न्याय देऊ असे म्हणत खासदारांना अस्वस्थ करण्यात आले.
ग्रामीण विकासाच्या मुद्द्यावरून ग्रामसेवकाला खडसावले
ग्रामीण विकासाची कास ज्यांच्या हातात असतात अशा ग्रामसेवकाकडून गावाच्या विकासात होणारी कुचराई होत असल्याचे लक्षात येताच खासदार मेंढे यांनी एका ग्रामसेवकाला चांगलेच खडेबोल सुनावले.गावातील नागरिकांनी ग्रामसेवकांची तक्रार करताच सदर ग्रामसेवकाला समोर उभा करून नागरिकांच्या समोरच गावातील प्रलंबित समस्या तातडीने दूर करण्याची तंबी देत नागरिकांचा कुठल्याही गोष्टीचा त्रास होता कामा नये,अशा सूचना दिल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला.
समोर निवडणुका आणि जनता दरबार सुरू...
मागील चार वर्षात खासदारांचा जनता दरबार कधी बघायला मिळाला नाही. मात्र, आता लोकसभेचा कार्यकाळ संपण्याच्या मार्गावर असून येत्या काही महिन्यांत निवडणुका लागू शकतात. ही बाब लक्षात घेता कधी नव्हे ते आता खासदार यांनी जनता दरबार घ्यायला सुरुवात केली आहे. हे कार्य निरंतर सुरू असते तर नागरिकांच्या समस्यांचा डोंगर उभा राहिला नसता, अशा चर्चा आता नागरिकांमध्ये सुरू आहेत.
नागरिकांच्या समस्या सोडविता याव्या यासाठी जनता दरबार - सुनील मेंढे
गेल्या चार वर्षात सातत्याने नागरिकांच्या समस्या सोडवाव्या यासाठी प्रयत्न करत आहे. केंद्र सरकारने नव वर्षात राबविलेल्या योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात या दृष्टीने जनता दरबार आणि दिव्यांग साहित्य वाटप करण्यात येत आहे. या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडवून त्यांना प्राधान्याने न्याय द्यावा, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यातून प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात येत आहे.