Bhandara Rain : भंडारा (Bhandara) जिल्ह्यात सलग दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरु आहे. या पावसामुळं भंडारा जिल्ह्यातील जीवनदायीनी  मानली जाणारी वैनगंगा नदीने (Wainganga River) धोक्याची पातळी ओलांडली आहे. धोक्याची पातली ओलांडून दीड मीटरवरुन नदीचे पाणी वाहत आहे. त्यामुळं भंडारा जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, वैनगंगा नदीचे पाणी शहरात शिरु नये म्हणून, गोसे खुर्द धरणाचा विसर्ग वाढवण्यात आला आहे.


मध्य प्रदेशातील संजय सरोवर आणि गोंदिया जिल्ह्यातील पावसामुळं भंडारा जिल्ह्यातील जीवनदायीनी मानली जाणारी वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. भंडारा जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. 2020 मध्ये आलेल्या महापुराची स्थिती पुन्हा येऊ नये म्हणून गोसे प्रशासनाचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. तथापी भंडाऱ्याला जोडणारा ब्रिटिश कालीन पूल वैनगंगा नदीच्या पाण्याखाली गेला आहे. पुलावरुन तीन फुटावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे छोट्या वाहनांची रहदारी या पुलावरून बंद करण्यात आली आहे. तर दुसरीकडे भंडारा जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आहे. तर वैनगंगा नदीचे बॅक वॉटर शहरात घुसू नये म्हणून गोसेचा विसर्ग 14000 क्यूसेक्सने वाढवण्यात आला आहे. तसेच नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 




पाण्याचा अंदाज न आल्याने ट्र्रॅक्टर नाल्यात बुडाला 


पाण्याचा अंदाज न आल्यानं रोवनी कामासाठी गेलेला ट्रॅक्टर नाल्यात बुडाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील आंधळगाव येथे घडली आहे. त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने तीन तासांच्या अथक प्रयत्नाने ट्रॅक्टरला बाहेर काढण्यात यश आले आहे. अरुण समरित यांचा हा ट्रॅक्टर असून, शेतीच्या कामासाठी जात असताना आंधळगाव जवळीळ असलेल्या नाल्यात अंदाज न आल्याने ट्रॅक्टर बुडाला. वेळीच ड्राइवर बाहेर निघाल्याने धोका टळला. मात्र ट्रॅक्टर पूर्णपणे नाल्यात बुड़ून गेला होता. अखेर क्रेनला पाचरन करत तीन तासाच्या अथक प्रयत्नाने ट्रॅक्टरला बाहेर काढण्यात यश आले. 




अतिवृष्टिमुळे मोहाडी पोलीस स्टेशनमध्ये शिरलं पावसाचे पाणी


अतिवृष्टिमुळं मोहाडी पोलीस स्टेशनमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. पोलीस स्टेशनजवळील नाले ओवरफ्लो झाले आहेत. भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी येथे कालपासून जोरदार पाऊस सुरु आहे. अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळं मोहाडी पोलीस स्टेशनमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. पोलीस स्टेशनला तलावचे स्वरूप प्राप्त झाले आहे. यामुळं पोलिसांची एकच तारांबळ उडाली असून गुन्ह्याची महत्वपूर्ण कागदपत्रे सुरक्षित ठेवण्यासाठी पोलिसांची धावपळ उडाली होती. 


तुमसर तालुक्यात बघेडा तलाव ओव्हरफ्लो


भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यात बघेडा तलाव ओव्हरफ्लो झाल्याने बघेडा गावात तलावाच्या पुराचे पाणी घूसले आहे. त्यामुळं 40 घरांचे नुकसान प्रचंड नुकसान झाले आहे. या गावातील तब्बल 190 लोकांना जिल्हा परिषदत प्राथमिक शाळा गर्रा बघेडा इथं स्थलांतरीत केले आहे. विशेष म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र बघेडाही पाण्याखाली आल्याने लोकांना आरोग्यची समस्या भेडसावत आहे. या शाळेत तात्पुरती राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. 


महत्त्वाच्या बातम्या: