भंडारा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते भंडाऱ्यात 547 कोटींच्या विकासकामाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाने महायुतीत मतभेदाची दरी निर्माण केली आहे का असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. कारण भाजप नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली होती. आता भंडाराचे माजी खासदार आणि भाजप नेते सुनील मेंढे यांनी भाजप नेत्यांना कार्यक्रमाचं निमंत्रणात नसल्याचा गंभीर आरोप केला आहे. एवढंच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनाही कार्यक्रमाचा निमंत्रण नव्हतं. त्यामुळे महायुतीत समन्वयाचा अभाव दिसत असून समन्वय वाढवण्याची गरज असल्याचं मेंढे म्हणाले.


मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात निमंत्रण न मिळाल्याने नाराज झालेले माजी खासदार सुनील मेंढे म्हणाले की, मुख्यमंत्री भंडाऱ्यात येत असताना भाजपच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना त्याचं रीतसर निमंत्रण मिळणं अपेक्षित होतं. मात्र स्थानिक शिवसेना आमदार, प्रशासन किंवा मुख्यमंत्री कार्यालय कुठूनही भाजप नेत्यांना निमंत्रण नव्हतं. मुख्यमंत्र्यांनी स्वतः आम्हाला निमंत्रण द्यावं असं आम्हाला अपेक्षित नाहीच. मात्र त्यांच्या कार्यालयातून निमंत्रण यायला हवं होतं.


कार्यक्रमाच्या आधी 7 मिनिटे फोन केला 


सोमवारी दुपारी 12 वाजता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजनाचा कार्यक्रम नियोजित असताना सकाळी 11:48 आणि 11:53 वाजता शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या कार्यालयातून  दोन फोन आले. कार्यक्रमाच्या अवघ्या सात मिनिटे आणि बारा मिनिटे आधी आलेल्या फोनच्या आधारे आम्ही कार्यक्रमात कसे उपस्थित राहावे असा सवाल ही मेंढे यांनी उपस्थित केला आहे.


आम्हाला दुःख आहे की महायुतीचे मुख्यमंत्री भंडाऱ्यात येतात आणि महायुतीतील इतर पक्षातील नेत्यांना त्याची नीट सूचना दिली जात नाही. अशा स्थितीत आम्ही काय करावं असा प्रश्न ही मेंढे यांनी उपस्थित केला. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमात जायचं नाही असं काहीही ठरवलं नव्हतं. मात्र निमंत्रण नव्हते म्हणून अनेक पदाधिकारी कार्यक्रमात गेले नसावे असे सुनील मेंढे यांनी स्पष्ट केलं. 


भूमीपूजनाच्या फलकावर देवेंद्र फडणवीसांचे नावच नाही


दरम्यान, भूमिपूजनाच्या फलकावर जलसंपदा मंत्री आणि पर्यटनमंत्री यांचे नाव नसणे ही खेदाची बाब आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतूनच हा प्रकल्प आकारास येत असताना त्यांचं नाव भूमिपूजनाच्या फलकावर नसणे खेदाची बाब असल्याचे मेंढे म्हणाले. भूमिपूजनाचा तो फलक बदलण्यात यावा अशी मागणीही मेंढे यांनी केली आहे. 


निश्चितच महायुतीत जास्त समन्वयाची गरज आहे. कारण फक्त भाजपच नव्हे, तर राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही कार्यक्रमाचे निमंत्रण नव्हतं. मुख्यमंत्री आमचे सर्वांचे आहेत. त्यांच्या आगमनाची माहिती आणि निमंत्रण मिळायलाच हवं होतं अशी अपेक्षा ही मेंढे यांनी व्यक्त केली. 


ही बातमी वाचा: