ST Transport Bank Rada : एसटी ट्रान्सपोर्ट बँकेच्या (ST Transport Bank) सभेत राडा घालणाऱ्या संदीप शिंदे (Sandeep Shinde) यांच्यावर भंडाऱ्यात (Bhandara) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सभा उधळून लावणे, धक्काबुक्की करणे, खुर्च्यांची तोडफोड करणे, अहवाल पुस्तक फाडणे, मारहाणीत एक कामगार जखमी होणे असे आरोप त्यांच्यावर करण्यात आले आहेत. 


नथुराम गोडसे यांचं छायाचित्र असल्यानं विरोधकांनी घेतला आक्षेप


एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या एसटी ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेची 71 वी सर्वसाधारण सभा काल भंडाऱ्यात होती. या सभेदरम्यान अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधी संघटनांनी राडा घातला. याप्रकरणी दापोडी आगाराचे एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांच्या विरोधात भंडाऱ्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल भंडारा इथं मुस्लिम लायब्ररी सभागृहात एसटी ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेची सर्वसाधारण सभा होती. या सभेत ऍड गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधकांनी गोंधळ घातला. सर्वसाधारण सभेच्या वार्षिक विशेषांकावर छत्रपती शिवाजी महाराज आणि प्रभू श्रीरामचंद्र यांच्या छायाचित्रासह नथुराम गोडसे यांचं छायाचित्र असल्यानं विरोधकांनी यावर आक्षेप घेत हा सभेत गोंधळ घातला होता. 


गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी 


दरम्यान, यावेळी अहवालाची पुस्तकं फाडण्यात आली होती. तसेच गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली होती. तसेच धक्काबुक्की करून खुर्च्याची तोडफोड करत त्या एकमेकांवर फेकल्या होत्या. यात सदावर्ते यांच्या बाजूचा एक कामगार जखमी झाला होता. या प्रकरणात सुरेंद्र उके यांच्या तक्रारीवरून संदीप शिंदे यांच्या विरोधात भंडारा पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीवरून त्यांच्यावर 356(2), 125(A) या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


संदीप शिंदेंचा आरोप काय?


एसटी कामगार कृती संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिथं सदावर्ते पती पत्नी आहेत, तिथं निश्चितपणे राडा आलाच. सदावर्ते यांनी एसटीच्या बाहेरचे सभासद बनवण्याचा कुटील डाव रचला आहे. एसटीच्या बाहेरील सभासद बनवल्यास बँक बुडण्याचा धोका आहे. भंडाऱ्यात पार पडलेली सभा ही कुठल्याही नियमानुसार, कायद्यानुसार झालेली नाही. अॅड गुणरत्न सदावर्ते हे स्वतः वकील असून बँकेतून त्यांनी 35 लाख रुपये लुटले. सदावर्ते यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा ठराव सर्वसाधारण सभेत पारित केला. 34 कोटींचे डेटा सेंटर आणलेत त्यात मोठा अपहार करण्यात आलेला आहे. सर्वसाधारण सभासदांना या सभेत बोलण्याची संधी दिली नाही. त्यामुळे ही सभा उधळून लावली. सदावर्तेंमध्ये दम असेल तर समोरासमोर यावं. हॉटेलमध्ये झोपा काढून बाउन्सर एसटीच्या सभासदांवर पाठवून भ्याडपणा करू नये.


महत्वाच्या बातम्या:


खुर्च्या फेकल्या, एकमेकांना धक्काबुक्की; भंडाऱ्यात सदावर्तेंच्या एसटी बँकेची सभा उधळली