भंडारा : गेल्या महिन्यात भंडाऱ्यातील अड्याळ परिक्षेत्रात लोकांनी वाघासोबत फोटोसेशन केल्याची घटना ताजी असतानाच तशाच प्रकारची घटना आता कवलेवाडा गावात घडली आहे. या गावातील ग्रामस्थांनी वाघासोबत, अगदी दहा फुटावरून फोटोसेशन केल्याचं दिसून आलं. काही लोकांनी वाघाच्या डोळ्यावर टॉर्च मारला तर काहींनी वाघालाच दगडं मारल्याचं दिसून आलं. महत्त्वाचं म्हणजे त्या वाघाने नुकतंच एका महिलेचा जीव घेतला होता आणि मृतदेहाजवळच ठाण मांडली होती. अशाही परिस्थितीत लोकांनी वाघाचे फोटो आणि व्हिडीओ काढले. 


नेमकं काय घडलं? 


भंडाऱ्याच्या कवलेवाडा गावातील एका महिलेवर झुडपात दबा धरून बसलेल्या वाघानं हल्ला करून तिला ठार केलं. त्यानंतर वाघाने त्या महिलेचा मृतदेह लगतच्या झुडपात फरफडत नेला आणि मृतदेहाजवळ ठाण मांडला. याची माहिती होताच ग्रामस्थांनी वाघाला घेराव घालून त्याच्यासोबत अगदी दहा फूट अंतरावरून धोकादायक फोटोसेशन केलं. तर काही संतप्त ग्रामस्थांनी त्याला दगड आणि काठ्या मारून हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाघांनं महिलेच्या मृतदेहाजवळचं ठिय्या मांडल्यानं ग्रामस्थांनी त्याची माहिती वनाधिकारी आणि पोलीस विभागाला दिली. 


नंदा किसन खंडाते (50) रा. कवलेवाडा असं मृतक महिलेचं नावं आहे. वाघानं हल्ला करून ठार केल्याची या आठवड्यातील ही दुसरी घटना आहे. मागील महिन्यात भंडारा जिल्ह्यात अड्याळ वनपरिक्षेत्रात असलेल्या एका वाघासोबत नागरिकांनी अगदी दोन ते पाच फूट अंतरावरून धोकादायक फोटोसेशन केल्याचा संतापजनक प्रकार घडला होता.