भंडारा: पृथ्वीराज चव्हाणांना (Prithviraj Chavan) जर वाटतं असेल की 2014 चं सरकार राष्ट्रवादीमुळं (NCP) पडलं असेल तर आज ते राष्ट्रवादीसोबत युती करून का काम करत आहेत असा सवाल राष्ट्रवादी अजित पवार गटाचे खासदार प्रफुल पटेल यांनी विचारला आहे. पृथ्वीराज चव्हाण हे स्वतः राष्ट्रवादीच्या मदतीने आमदार झाले आहेत, त्यांचे आरोप म्हणजे एकमेंकांवर चिखलफेक करण्याचं काम आहे, मी यावर फार काही बोलू इच्छित नाही असंही ते म्हणाले. 


राष्ट्रवादी काँग्रेसने आमचं सरकार पाडलं नसतं तर आम्ही नक्कीच मराठा आरक्षण (Maratha reservation) टिकवलं असतं, असं खळबळजनक वक्तव्य माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण  यांनी केलं होतं. आता त्यावर खासदार प्रफुल पटेल यांनी प्रतिक्रिया दिली. 


खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले की, पृथ्वीराज चव्हाण यांना जर तसं वाटत असतं तर नंतर त्यांनी राष्ट्रवादीसोबत युती करायला नको होती. ते स्वतः राष्ट्रवादीच्या मदतीने आमदार झाले आहेत. तेव्हाची राष्ट्रवादी आणि आताची राष्ट्रवादी वेगळी आहे. 


नरेंद्र मोदी यांचे नाव या शतकामध्ये स्वर्ण अक्षरात लिहिलं जाणार


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करताना प्रफुल पटेल म्हणाले की, नरेंद्र मोदी हे नक्कीच या देशाचे फार मोठे नेते आहेत. या शतकामध्ये त्यांचं नावं स्वर्ण अक्षरात लिहिलं जाणार आहे. एकदा कुठलाही व्यक्ती ज्याचे बॅकग्राउंड नाही, स्वतःच्या श्रमाने, स्वतःच्या मेहनतीनं ते आज देशाचे पंतप्रधान झाले. ते निस्वार्थ भावनेनं काम करतात.


भुजबळ हे ओबीसींच्या हिताचे बोलतात


भुजबळ मराठ्यांना आरक्षण देण्याबद्दल जे काही बोलत आहेत, ते ओबीसीच्या हितार्थ आणि आजवर त्यांनी ज्याप्रकारे ओबीसींसाठी लढाई लढली त्या अनुषंगानेच बोलत आहेत असं खासदार प्रफुल पटेल म्हणाले. ते म्हणाले की, आमची पक्षाची देखील अधिकृत भूमिका आहे की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे. त्यासाठी शासनाच्या वतीने तीन न्यायमूर्तींना घेऊन समिती नेमण्यात आली असून समितीचे काम योग्यपणे सुरू आहे. जितक्या लवकरात लवकर समितीचे काम संपेल तितक्या लवकर ओबीसींना न्याय मिळेल. आरक्षण मिळाल्याशिवाय आमचे सरकार थांबणार नाही.


मराठा आरक्षणासाठी देवेंद्र फडणवीस यांनी खरोखर काम केलं


ज्या माणसाने मराठा आरक्षणासाठी खरोखर काम केलं असेल तर ते म्हणजे देवेंद्र फडणवीस असं खासदार प्रफुल पटेल म्हणाले. ते म्हणाले की, फडणवीसांच्या 2014 ते 2019 पर्यंतच्या सरकारने मराठा आरक्षण दिलं.त्यावेळी त्यांनी हायकोर्टातही आरक्षण टिकवलं. काही तांत्रिक बाबींमुळे सुप्रीम कोर्टात ते अमान्य करण्यात आले. अशात ज्यांनी मराठ्यांच्या आरक्षणासंदर्भात काहीच केलं नाही ते आता त्या संदर्भात बोलतात. मला या संदर्भात कुणावर टीका करायची नाही. तसा माझ्या स्वभाव नाही. परंतु जे कोणी प्रयत्न करतात त्यांना क्रेडिट तरी द्या. माझी जरांगे पाटलांना देखील विनंती आहे की थोडा धीर ठेवा. आज इतकी टोकाची भूमिका घेऊ नका, संयम जर सर्वांनीच बाळगला तर नक्कीच मराठा समाजाच्या हितासाठी निर्णय घेतला जाईल. 


ही बातमी वाचा: