Bhandara CT 1 Tiger Terror : भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या लाखांदूर तालुक्यात सीटी 1 (CT 1) या नरभक्षी वाघाची दहशत पहायला मिळत आहे. या वाघाच्या धास्तीने परिसरातील शेतशिवार निर्मनुष्य झाले आहेत. आता वन विभागाची तीन पथके वाघाच्या शोधात वणवण भटकत आहेत. मागील आठवड्यात कन्हाळगाव या गावातील तेजराम कार या शेतकऱ्यावर त्यांच्याच शेतात वाघाने हल्ला करुन त्यांना जंगलात फरफटत नेल्याची घटना घडली होती. तेव्हापासून हे ग्रामस्थ वाघाच्या दहशतीत आहेत. धानाला रोग लागलेला असतानाही त्यावर फवारणीसाठी शेतात न जाता, जीव वाचवून हे सर्व ग्रामस्थ दिवसभर गावातील चौकात चिंताग्रस्त बसून असतात. आता धान पीक वाचवायाचे की जीव, हा यक्षप्रश्न ग्रामस्थांसमोर आहे. 


वाघाने गावकऱ्यावर हल्ला करुन दीड किमी जंगलात फरफटत नेलं
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर वनपरिक्षेत्रातून आलेला CT 1 हा वाघ जानेवारी महिन्यात भंडारा जिल्ह्यात पोहोचला. या वाघाने लाखांदूर तालुक्यातील चार शेतकऱ्यांचा बळी घेतला आहे. मागील दहा दिवसात या वाघाने दोघांवर हल्ला करुन त्यांना ठार केल्याने तालुक्यातील शेतकरी नागरिक भयभीत झालेले आहेत. मागील आठवड्यात कन्हाळगाव येथील शेतकरी तेजाराम कार हे शेतावर गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या तेजाराम कार यांच्यावर वाघाने हल्ला करुन त्यांना अक्षरश: दीड किलोमीटर अंतरावर जंगलात फरफटत नेलं होतं. वाघाच्या हल्ल्याचा हा थरारक प्रसंग अवघ्या दोन फूट अंतरावरुन बघणाऱ्या प्रल्हाद प्रधान या तरुणाने वाघाला हुसकावण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र, त्याचे प्रयत्न कमी पडले आणि तेजराम यांचा वाघाने त्याच्या डोळ्यासमोर बळी घेतला. याचा प्रसंग सांगताना आजही प्रल्हादच्या आंगावर शहारा येत आहेत. 


भंडाऱ्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यात वाघाची दहशत
2018 मध्ये यवतमाळ जिल्ह्यात अवनी या वाघाची दहशत पसरली होती. मादी वाघ असलेल्या अवनीने तब्बल 13 जणांचा बळी घेतला होता. त्यानंतर त्या वाघिणीला ठार मारण्यात आले होते. आता अवनी वाघिणीसारखी दहशत लाखांदूर तालुक्यातच नव्हे तर, लगतच्या गडचिरोली जिल्ह्यातील वडसा, गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव आणि चंद्रपूर जिल्ह्यातीलही काही तालुक्यात या CT 1 वाघाने पसरवली आहे. 


भंडारा जिल्ह्यात CT 1 वाघाने घेतलेल्या बळीची आकडेवारी पाहूया


1) 27 जानेवारी - प्रमोद चौधरी, लाखांदूर


2) 05 एप्रिल - जयपाल कुंभरे, इंदोरा, लाखांदूर


3) 21 सप्टेंबर - विनय मंडल, रा. अरुण नगर, गोंदिया


4) 30 सप्टेंबर - तेजराम कार, कन्हाळगाव, भंडारा


धानाला कीड लागलेली असतानाही भीतीपोटी शेतावर जाणं बंद
वाघाच्या हल्ल्यानंतर गावातील नागरिक अक्षरश: भयभीत झालेले आहेत. त्यामुळे मागील आठ दिवसांपासून त्यांनी शेतावर जाणे बंद केलं आहे. एकीकडे वाघाची दहशत तर, दुसरीकडे शेतातील उभ्या धानाला लागलेली कीड, यामुळे त्यावर औषध फवारणी होत नसल्याने धानही नष्ट होत आहे. वाघाच्या भीतीने आता गाव परिसरातील नागरिक जथ्याने एकत्र दिसू लागले आहेत. गावात कुणाची गाडी आली तरी, हे सर्व त्या गाडीभोवती जमा होऊन वाघाला मारले का? किंवा त्याला पकडले का? अशी केविलवाणी विचारणा करताना दिसून येत आहेत. 


वन विभागाचं कोम्बिंग ऑपरेशन
तर दुसरीकडे या नरभक्षी वाघाला पकडण्यासाठी भंडारा वन विभागाने जंगलात कोम्बिंग ऑपरेशन सुरु केलं आहे. या दरम्यान सहा मचान उभारले असून अनेक ठिकाणी 61 ट्रॅप कॅमेरे लावून तीन पथकाद्वारे वाघाची शोध मोहीम सुरु आहे. दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नागरिकांमध्ये पसरलेली दहशत बंद करण्यासाठी वाघाला ठार मारावे किंवा जेरबंद करावे अशी मागणी केली आहे. 


एकंदरीत लाखांदुरात वाघाची दहशत वन विभागाच्या आणि परिसरातील ग्रामस्थांच्या जीवाला घोर ठरली आहे. त्यामुळे वेळीच या नरभक्षी वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरत आहे.