भंडारा : भंडाऱ्यातील  (Bhandara) शहापूर येथील परीक्षा केंद्रावर (HSC Exam Centre) कॉपीमुक्तच्या नावावर विद्यार्थिनींच्या तपासणीचा संतापजनक आणि किळसवाणा प्रकार उघडकीस आला होता. एबीपी माझाने ही बातमी दाखविताच मोठी खळबळ उडाली. याप्रकरणी भंडारा जिल्हाधिकारी यांनी शिक्षणाधिकारी यांच्या माध्यमातून चौकशीचे आदेश बजावले असून चौकशी प्रारंभ झाली आहे. दरम्यान, शहापूर येथील परीक्षा केंद्रावर भेट दिली असता महाविद्यालयाचे प्राचार्य विनोद भोंगाडे यांनी विद्यार्थिनींनी लावलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.


भंडारा जिल्ह्यातील शहापूर येथील नानाजी जोशी कनिष्ठ महाविद्यालयात बारावीची परीक्षा सुरू आहे. या परीक्षा केंद्रावर तब्बल 452 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. शहापूर येथील डिफेन्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांमध्ये नानाजी जोशी विद्यालयाचे शिक्षक दुजाभाव करीत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी लावला होता. सोबतच परीक्षार्थी विद्यार्थिनींचे कॉपीमुक्तच्या नावावर होत असलेली तपासणी अगदी किळसवाणी आणि लज्जास्पद असल्याचा आरोप विद्यार्थिनींनी केला. त्याची तक्रार भंडारा जिल्हाधिकारी यांना करण्यात असल्याने प्रकरण समोर आलं. 


एबीपीनं बातमी दाखवताच महाविद्यालय प्रशासनात मोठी खळबळ उडाली. याबाबत आज महाविद्यालयात पोहचल्यावर तेथील परिस्थिती बघितलं असता परीक्षा सुरळीत सुरू दिसली. सोबतच कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त महाविद्यालयात बघायला मिळाला.


दरम्यान, महाविद्यालयाचे प्राचार्य विनोद भोंगाडे यांनी असा कुठलाही प्रकार घडला नसून महाविद्यालयाची नाहक बदनामी करण्यात येत असल्याचे सांगितलं आहे. मात्र, विद्यार्थिनीच्या लज्जास्पद तपासणीची गंभीर दखल भंडारा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी घेतली असून शिक्षणाधिकारी यांच्या माध्यमातून चौकशीचे आदेश दिल्यानं याची चौकशी सुरू झालेली आहे. 


परीक्षेआधी अशा प्रकारच्या तपासणीमुळे विद्यार्थीनींचं मानसिक खच्चीकरण होत असल्याचं सांगत शाळेनं जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. भंडाऱ्यातील शहापूर येथील नानाजी जोशी विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर हा किळसवाणा प्रकार घडल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी दिली आहे. शहापूर येथील नानाजी जोशी महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर डिफेन्स सर्व्हिसेस कनिष्ठ महाविद्यालयाचे 306 विद्यार्थी आणि नानाजी जोशी विद्यालयाचे 146 विद्यार्थी बारावीची परीक्षा देत आहेत.


डिफेन्स सर्व्हिसेस कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसोबत हा प्रकार घडला आहे. कॉपीमुक्तच्या नावावर परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांची तीन ते चार वेळा शारीरिक तपासणी करण्याचा किळसवाणा प्रकार होत असल्यानं विद्यार्थी मानसिकदृष्ट्या कमजोर होत आहे. शहापूर येथील परीक्षा केंद्रावर झालेल्या प्रकाराची जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार झाल्यानं जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.