Cow Smuggling :  भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील सिरसाळा इथं गो तस्करीचं रॅकेट (Cow Smuggling) उघड झालं आहे. अवघ्या आठवडाभरात भंडारा जिल्ह्यात दोन गोशाळा संचालकांवर जनावरे विकल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. पहिली कारवाई पवनी येथे तर दुसरी कारवाई साकोली येथे करण्यात आली आहे. कत्तलखान्याकडे जाणाऱ्या गोवंशाची पोलिसांनी सुटका करून त्यांना गोशाळेत ठेवले. मात्र, गोशाळा संचालकांनी गोवंशाचे खोटे मृत्यू प्रमाणपत्र, खोटे साक्षदार आणि बनावट कागदपत्र तयार करून त्यांची विक्री केली. या माध्यामातून साकोली येथील गोशाळा संचालकांनी तब्बल 13 लाख 65 हजारांनी न्यायालयाची दिशाभूल केल्याचे गंभीर प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी गोशाळेच्या अध्यक्ष, सचिव यांच्यासह 13 संचालकांवर गुन्हा दाखल झाला आहे.


मागील आठवड्यात पवनीत गोशाळेच्या 13 संचालकांसह चार पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. आता, साकोली तालुक्यातील हे दुसरे प्रकरण समोर आले आहे. बाम्हणी येथे माँ गोशाळा आहे.1 ऑगस्ट 2020 ला गोंदिया जिल्ह्यात पोलिसांनी कत्तलीसाठी जाणाऱ्या 285 जनावरांची सुटका करून त्या सर्वांना न्यायालयाच्या आदेशाने माँ गोशाळा येथे ठेवले. मात्र, कालांतराने गोशाळा संचालकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी 285 जनावरांची परस्पर विल्हेवाट लावली. त्यापैकी तब्बल 175 जनावरे मृत पावल्याचे दाखवून 163 जनावरांचे पोस्टमार्टम न करताच केवळ 12 जनावरांचे पोस्टमार्टम करून संस्था चालकांनी खोटे मृत्यू प्रमाणपत्र, खोटे स्थळ पंचनामे, खोटे साक्षदार, खोट्या स्वाक्षऱ्यांच्या माध्यमातून बनावट कागदपत्र तयार करून 285 जनावरांची परस्पर विक्री करून न्यायालयाची 13 लाख 65 हजारांनी फसवणूक केल्याची धक्कादायक बाब चौकशीत समोर आली. 


एवढेच नव्हे तर, काही जनावरे शेतकऱ्यांना हमीपत्रावर दिल्याचे समोर आले. मात्र, ते हमीपत्रही बनावट आणि त्यावरील शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्याही खोट्या असल्याची गंभीर बाब चौकशीत उघड झाली. काही शेतकरी निरक्षर असतानाही त्यांच्या नावाने तयार केलेल्या हमीपत्रावर चक्क स्वाक्षऱ्या करण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले. याप्रकरणी लाखनी पोलिसात 13 संचालकांवर 406, 420, 467, 468, 471, 34 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


 भंडारा जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात गो तस्करी होत असल्याचे या दोन्ही प्रकरणावरून शिक्कामोर्तब झाले आहे. एकापाठोपाठ दुसऱ्याही गोशाळेवर कारवाई झाल्याने अन्य गोशाळा संचालकांचे आता धाबे दणाणले आहेत. यात गोशाळा संचालकच नव्हे तर, ज्यांनी ज्यांनी ही जनावरे खरेदी केलेली आहे, त्यांच्यावरही आता कारवाई होणार आहे