भंडारा : पैसे दामदुप्पट करण्याच्या आमिषाने अॅक्सिस बँकेच्या मॅनेंजरनेच पाच कोटींचा घोटाळा करण्याच्या प्रयत्न केल्याचं प्रकरण उघडकीस आलं. या प्रकरणात पोलिसांनी आता आणखी एका आरोपीला अटक केली आहे. त्यामुळे आरोपींची संख्या आता दहावर पोहोचली आहे. अॅक्सिस बँकेच्या मॅनेंजरने उत्तराखंडच्या टोळीच्या मदतीने हा प्रकार करण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांच्या प्रयत्नामुळे तो उघडकीस आला. 


पाच कोटींच्या बदल्यात सात कोटी रुपये देण्याचं प्रलोभन देत उत्तराखंड, छत्तीसगड आणि गोंदियाच्या टोळीनं भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील ॲक्सिस बँकेच्या मॅनेजरलाचं जाळ्यात ओढलं. त्या पैशाच्या आमिषाने ॲक्सिस बँकेचे मॅनेजरने त्याच्या सहकारी कर्मचाऱ्यांच्या मदतीनं बँकेतून पाच कोटी रुपये काढले. मात्र, पुढील अनर्थ होण्याच्यापूर्वीचं भंडारा पोलिसांनी ॲक्शन मोडवर येत फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपींच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी बँकेतून काढलेली पाच कोटींची रक्कम ताब्यात घेतली. मंगळवारी या कारवाईत भंडारा पोलिसांनी 9 आरोपींना ताब्यात घेतलं होतं. बुधवारी पुन्हा एका आरोपीला ताब्यात घेतलं असून आरोपींची संख्या आता दहावर पोहोचली आहे.


तुमसर येथील ॲक्सिस बँकेत गौरीशंकर बावनकुळे हा बँक मॅनेजर असून मागील सात महिन्यापासून या स्कॅम करणाऱ्या टोळीनं त्यांना दुप्पट रकमेचा आमिष दिलं. तत्पूर्वी या टोळीनं तुमसरच्या एका धनाड्य व्यावसायिकाला अशा प्रकारचं आमिष देऊन फसविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला या टोळीवर संशय आल्यानं तो यातून सुटला अशी माहिती आता समोर येत आहे. 


पाच कोटीची रक्कम ड्रायक्लीनर्समध्ये ठेवली होती


ॲक्सिस बँकेचा मॅनेजर गौशंकर बावनकुळे याने काढलेली ही रक्कम तुमसरच्या इंदिरानगर येथील राजकुमार ड्रायक्लीनर्स इथे ठेवली होती. या संपूर्ण प्रकरणात भंडारा पोलिसांनी मंगळवारी नऊ जणांना ताब्यात घेतलं. ॲक्सिस बँकेचा मॅनेंजर गौरीशंकर बावनकुळे आणि बँक कर्मचारी विशाल ठाकरे याच्यासह टोळीच्या सात जणांना ताब्यात घेतलं होतं. बुधवारी सकाळी आणखी एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतला असून आरोपींची संख्या आता दहावर पोहोचली आहे.


लुटमारी करणे हेच त्या टोळीचं काम


एखाद्याला फसवल्यानंतर त्यांच्याकडून मिळालेली लूट घेऊन पसार होणे, वाटेत लुटमार करण्याचा बहाणा करणे, किंवा एखाद्या एजन्सीच्या माध्यमातून प्रकरण सेटलमेंट करणे असा या टोळीचा गोरखधंदा असल्याचं समोर आलं. 


ज्या ड्रायक्लीनर्समध्ये ही रक्कम ठेवली, त्या व्यक्तीला एक लाख रुपये देण्याचं प्रलोभन या टोळीने दिलं होतं. उत्तराखंडचा मुख्य आरोपी विनीत कक्कड हा मागील काही दिवसांपासून गोंदियाच्या शुभम नागदेवे याच्या संपर्कात राहून हे षडयंत्र रचत होता. पोलिसांच्या कारवाईनंतर ब्लॅक मनी व्हाईट करण्याचा हा नवा प्रकार समोर आला आहे. 


ही बातमी वाचा: