Agriculture News : शेतकऱ्यांच्या (Farmers) शेतीला सिंचन करता यावं, यासाठी महावितरणनं (MSEB) कृषी पंप योजना अस्तित्वात आणली आहे. या मध्यामातून शेती सिंचन करुन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारनं केला आहे. मात्र, हीच योजना आता भंडारा (bhandara) जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांच्या जीवावर उठली आहे. शेतकऱ्यांच्या शेतातून गेलेल्या तारांचे पोल कोसळले आहे. त्या तारांचा विद्युत प्रवाहित असन, तारा शेतात अक्षरशः लोंबकळ आहेत. मागील तीन महिन्यांपासून ही परिस्थिती असतानाही महावितरणच्या अधिकाऱ्यांना वारंवार तक्रार करुनही ते दुर्लक्ष करत आहे. यामुळं शेतकऱ्यांचा जीव धोक्यात आला आहे.


प्रत्येक शेतकऱ्यांची शेती सिंचनाखाली यावी, त्यातून त्यांची आर्थिक प्रगती व्हावी, यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून विविध योजना अस्तित्वात आहेत. याचा फायदा शेतकरी घेऊन प्रगतीही साधत आहेत. किंबहुना शेतात लावलेल्या कृषी पंपांना विद्युत पुरवठा करून शेतकरी समृध्द बनवण्याचं धोरण राज्य सरकारचं आहे. अनेकांच्या शेतातील कृषी पंप चालावे, यासाठी शेतातून पोलची उभारणी करुन विद्युत् पुरवठा केला आहे. असं असलं तरी, कृषी पंपासाठी असलेली योजना आता भंडारा जिल्ह्यातील पिंपरी या गावातील शेतकऱ्यांसाठी जीवघेणी ठरली आहे. 
वीज प्रवाहित तारांना स्पर्श होऊन जीवितहानी होण्याची भीती


शेतकऱ्यांच्या शेतात ठिकठिकाणी पोल उभारलेत मात्र, ते आता कोसळल्यानं मागील तीन महिन्यांपासून त्याच्या तार शेतात अक्षरशः लोंबकळत आहेत. या तारांमध्ये विजेचा पुरवठा असून पुढील 25 शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत पंपांना तो पुरवठा होत आहे. सध्या खरीप हंगाम सुरु झाला असल्यानं शेतकरी मजुरांसह शेतात राबत आहेत. शेतात काम करत असताना या लोंबकळत असलेल्या वीज प्रवाहित तारांना स्पर्श होऊन जीवितहानी होण्याची अधिक शक्यता आहे. अगदी शेतात ट्रॅक्टरनं शेतीची मशागत करताना 'देशी जुगाड' करुन एका बांबूनं वीज प्रवाहित तारा उचलून शेतकरी शेतीची मशागत करत आहेत. हा देशी जुगाड कधीही शेतकऱ्यांच्या जीवावर बेतनारा आहे. याची वारंवार तक्रार करूनही महावितरणचे अधिकारी केवळ दोन दिवस थांबा म्हणून शेतकऱ्यांना आल्यापावली परतवून लावतात, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळं संभावित धोका टाळण्यासाठी गावातीलच काही तरुण डीपीतून होणारा विद्युत पुरवठा बंद करून शेतीची कामे आटोपतात. मात्र ही तरुण मंडळी नसली की, शेतकऱ्यांच्या शेतातील कामे खोळंबत असल्याचे चित्र आहे. 


राज्यातील राज्यकर्ते खुर्चीच्या राजकारणात गुंतलेले


सध्या राज्यातील राज्यकर्ते खुर्चीच्या राजकारणात गुंतलेले आहे. राजकीय नेते हे सरकार शेतकऱ्यांचं सरकार असल्याचं सांगत आहे. मात्र, भंडारा जिल्ह्यातील पिंपरी गावातील शेतकरी जीव धोक्यात घालून शेती करीत असताना त्यांच्या समस्यांकडे कुणी लक्ष देत नसल्यानं खरोखरचं सरकार शेतकऱ्यांचं आहे का? असा प्रश्न या शेतकऱ्यांना पडला आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Rain Update : वादळीवाऱ्यामुळे तारा तुटल्या, संभाजीनगरमधील दहा हजार घरांची वीज गुल; झाडंही उन्मळून पडली