Bhandara : एखाद्या घटनेत एखाद्या अधिकाऱ्यांला घेराव घातल्याचं आजपर्यंत आपल्याला बऱ्याचदा बघायला मिळाले आहे. मात्र, भंडाऱ्यात चक्क ग्रामस्थांनीचं जंगलाचा राजा असेलेल्या वाघोबाला घेराव घताला आहे. इतकंच नव्हे तर जमावातील काहींनी तर अगदी दहा फूट अंतरावरून वाघाचे व्हिडिओ, फोटो आणि त्याच्यासोबत सेल्फी काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वाघासोबत फोटो, व्हिडिओ आणि सेल्फी काढतानाचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमावर प्रचंड व्हायरल होत असल्याचा हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.


अगदी दहा फूट अंतरावरून डीवचण्याचा प्रयत्न 


भंडारा वन विभागाच्या अड्याळ वनपरिक्षेत्रातील कोतुर्ली गावाजवळ मागील काही दिवसांपासून वाघाचं वास्तव्य आहे. हा व्हिडिओ दोन दिवसांपूर्वीचा असून आता हा समाज माध्यमावर चांगलाच व्हायरल झाल्यानं समोर आला आहे. घटनेच्या दिवशी या वाघानं दोन पाळीव जनावरांची शिकार करून त्यांच्यावर ताव मारल्यानंतर तो एका झुडुपात दडून बसला होता. दरम्यान, याची माहिती मिळताच बघता बघता शेकडो ग्रामस्थ वाघ असलेल्या परिसरात पोहोचलेत. वाघ निस्तेज असल्याचं बघून अनेकांनी अगदी दहा फूट अंतरावरून त्याला डीवचण्याचा प्रकार केला.


नवेगाव-नागझिऱ्यातील NT-2 वाघिणीने तीन छाव्यांना जन्म


नवेगाव-नागझिऱ्यात गेल्या काळात अस्तित्वासाठी झालेला वाघांचा थरार गोंदिया जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील नागरिकांनी अनुभवला असताना आता वन्यजीव प्रेमींसाठी नागझिऱ्यातून खुशखबर आली आहे. गेल्या दिड वर्षांपूर्वी नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात आलेल्या NT-2 वाघिणीने तीन छाव्यांना जन्म दिले असून आपल्या आईसह रानगव्याच्या शिकारीनंतरचा फोटो ट्रॅप कॅमेर्‍यात कैद झाला आहे. त्यामुळे नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातर्फे व्याघ्र संवर्धनासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांना महत्त्वपूर्ण यश आले आहे. 


नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प (NNTR), गोंदिया येथे व्याघ्र संवर्धनासाठी महाराष्ट्र वन विभागाने राबविलेल्या वाघाचे संवर्धन स्थानांतरण, (Tiger Conservation Translocation) उपक्रमामध्ये आतापर्यंत एकूण 3 वाघीन नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये स्थानांतरण करण्यात आलेले आहे. त्यात पहिल्या टप्प्यामध्ये NT-1 व NT-2 ह्या वाघीनीला 20 मे 2023 रोजी तर दुसऱ्या टप्प्यामध्ये NT-3 या वाघीनीला 11 एप्रिल 2024 ला नागझिरा वन्यजीव अभयारण्य येथे निसर्गमुक्त करण्यात आले होते. त्यामध्ये NT-2 वाघिणीने नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रामध्ये सहजपणे आपली जागा निर्माण केली आणि आता सद्यास्थितीमध्ये ट्रॅप कॅमेराद्वारा NT-2 वाघिणीच्या हालचालीवर संनियंत्रण करण्यात येत आहे. सदर ट्रॅप कॅमेरामध्ये NT-2 वाघिणीचे प्रथमतःच तिच्या 3 छाव्यांसोबत रानगव्याच्या शिकारीवर फोटो प्राप्त झाला आहे. 


सद्या निसर्गमुक्त केलेल्या 3 वाघीनीपैकी 2 वाघीन ने नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रात (गाभा व बफर) आपला अधिवास निर्माण केला आहे. तेव्हा NT-2 वाघीनीच्या पिलांच्या जन्मामुळे प्रकल्पाच्या उद्दिष्टांना नवे यश व दिशा प्राप्त झाली आहे. NT-2 वाघिणीच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवण्यासाठी VHF/GPS कॉलर आणि कॅमेरा ट्रॅप यासारखी आधुनिक साधने वापरण्यात आली होती. ज्यामध्ये Command & Control Room चा महत्वाचा वाटा आहे. तसेच या यशामध्ये अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महाराष्ट्र राज्य नागपूर, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव पुर्व) नागपूर यांचे मार्गदर्शनात तसेच नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र, गोंदियाचे क्षेत्रसंचालक जयरामे गौडा आर. (भावसे) , साकोलीचे उपसंचालक पवन जेफ (भावसे), उपवनसंरक्षक प्रमोद पंचभाई (भावसे), विभागीय वन अधिकारी अतुल देवकर, सहायक वनसंरक्षक सचिन डोंगरवार, व्ही. के. भोसले, वनपरिक्षेत्र अधिकारी सपना टेंभरे, दिलीप कौशीक व वनविभागातील इतर कर्मचारी यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली.


हे ही वाचा