Bhagat Singh Koshyari: कंगना मला भेटायला आली, मग यांचा जळफळाट का झाला? असा सवाल राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विचारला. कंगना माझ्या मुलीसारखी आहे असंही ते म्हणाले. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी अनेक विषयांवर चर्चा केली. यावेळी त्यांना अभिनेत्री कंगना रनौतबद्दल (Kangana Ranaut) प्रश्न विचारल्यानंतर हे वक्तव्य केलं. भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
कंगना रनौत ही राज्य सरकारच्या विरोधात बोलत होती, तरी तिला भगतसिंह कोश्यारी यांनी सपोर्ट केला, असा आरोप कोश्यारी यांच्यावर करण्यात आला होता. याबद्दल प्रश्न विचारल्यानंतर भगतसिंह कोश्यारी म्हणाले, "असे आरोप करणारे जरी माझ्याकडे आले, तरी त्यांना मी भेटण्यास मनाई करेल का? ते काय 302 चे आरोपी आहेत का? कंगना ही अभिनेत्री आहे, माझ्या मुलीसारखी आहे. तिची तक्रार होती, ती मी ऐकली. कंगना मला भेटायला आली तर इतरांना वाईट का वाटावं? कंगना माझ्याकडे आल्यानं त्यांचा जळफळाट का? कंगना रनौत माझ्या मुलीसारखी आहे."
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटल्यानंतर कंगनानं एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडीओला तिनं कॅप्शन दिलं, 'थोड्या वेळापूर्वी मी महाराष्ट्राचे श्री भगतसिंग कोश्यारीजी यांची भेट घेतली. मी त्यांना माझा दृष्टिकोन समजावून सांगितला आणि मला न्याय द्यावा अशी विनंतीही केली, ज्यामुळे सामान्य नागरिकांचा आणि विशेषतः मुलींचा व्यवस्थेवरचा विश्वास परत येईल'
कंगनाचे चित्रपट
कंगनाचा इमर्जन्सी हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात ती इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार आहे. तिच्या या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. तसेच चंद्रमुखी-2 या चित्रपटामध्ये ती प्रमुख भूमिका साकारणार आहे, असंही म्हटलं जात आहे. मणिकर्णिका: क्विन ऑफ झाँसी, थलाईवी यांसारख्या चित्रपटांमध्ये कंगनानं काम केलं आहे. कंगना ही सोशल मीडियावर वेगवेगळ्या विषयांवरील तिची मतं शेअर करते. तिची वक्तव्य अनेकांचे लक्ष वेधतात. कंगनाच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. कंगना तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: