बीड : माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Mund) यांना शिंदे सरकारमध्ये मंत्रीपद मिळाले तर त्याचे स्वागत करू, असे मत माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी व्यक्त केलंय. शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात पंकजा मुंडे यांना स्थान न मिळाल्याने त्यांनी आपली नाराजी पुन्हा एकदा बोलून दाखवली आहे. मंत्रीपद मिळालं तर विकास करेल असं पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणात सांगितले. पंकजा मुंडेंच्या याच वक्तव्यावर धनंजय मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय. 


"मंत्रीपद देणे हे त्यांच्या पक्षाचे काम आहे. जर त्यांना मंत्रिपद मिळालं तर मला आनंदच होईल. पाच वर्षा मागे त्यांनाही मंत्रीपद होतं. आता पुढेही मिळालं आणि त्यातून त्यांच्या भागाचा विकास होत असेल तर त्याचं मी स्वागतच करेन असं मत धनंजय मुंडे यांनी व्यक्त केलंय.


प्रीतम मुंडेंवर टीका 
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त परळी नगर परिषदेच्या माध्यमातून शहरात मराठवाड्यातील सर्वात मोठा तिरंगा ध्वज उभारण्यात आला आहे. या ध्वजाची उंची दीडशे फूट असून सबंध शहरभरातून हा ध्वज फडकताना पाहायला मिळतोय. माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते याचं लोकार्पण करण्यात आलं. दरम्यान, या कार्यक्रमात धनंजय मुंडे यांनी परळीकरांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्यात. तर माध्यमांसोबत साधण्यात आलेल्या संवादा दरम्यान बहीण खासदार प्रीतम मुंडे यांच्यावर धनंजय मुंडे यांनी निशाणा साधला आहे.


"या कार्यक्रमासाठी खासदार प्रीतम मुंडे यांना निमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र त्यांनी या कार्यक्रमाला पाठ फिरवली आहे. त्यांना  यापेक्षाही मोठी देशसेवा करायची असेल म्हणून त्या आल्या नाही. असा खोचक टोला धनंजय मुंडे यांनी प्रीतम मुंडे यांना लगावला आहे. तर शिंदे सरकारच्या मंत्री मंडळात त्यांच्या पक्षातील मंत्री का नाहीत? त्याचं उत्तर पंकजा मुंडेच देऊ शकतील असं धनंजय मुंडे म्हणाले. सरकार कोणाचं ही असो कोणतही काम रखडणार नाही. असा विश्वास धनंजय मुंडे यांनी यावेळी व्यक्त केला आहे.


पंकजा मुंडे नाराज
शिंदे सरकारमध्ये स्थान न मिळाल्याने पंकजा मराजी बोलून दाखवली आहे. मंत्री पदाची माझी पात्रता नसेल म्हणून मला मंत्री पद दिलं नसेल असं पंकजा मुंडे यांनी या पूर्वी म्हटलं होतं. तर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले असतांना आपला यासाठी खारीचा काय मुंगीचा देखील वाटा नसल्याचं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं आहे. या प्रक्रियेमध्ये मी पूर्णपणे अनभिज्ञ असल्याचं सुद्धा पंकजा म्हणाल्या आहेत.  


महत्वाच्या बातम्या


Pankaja Munde: शिंदे-फडणवीस सरकार स्थापनेत माझा मुंगीचाही वाटा नाही; पंकजा मुंडेंचा गौप्यस्फोट