बीड: संतोष देशमुख हत्याप्रकरणात रडारवर असलेला वाल्मीक कराड लवकरच पोलिसांसमोर आत्मसमर्पण करणार असल्याची माहिती समोर आली आहे. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. तेव्हापासून वाल्मीक कराड फरार आहे. मात्र, तो सोमवारी संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत बीड पोलिसांसमोर आत्मसमपर्ण करेल, असे सांगितले जात आहे. वाल्मीक कराड हा महाराष्ट्रातच आहे की राज्याबाहेर आहे, याबाबत नेमकी माहिती नाही. तो राज्याबाहेर असल्यास मंगळवारी सकाळपर्यंत पोलिसांना शरण जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
वाल्मीक कराड हा धनंजय मुंडे यांचा खास कार्यकर्ता असल्यामुळे पोलीस त्याच्यावर कारवाई करत नाहीत, असा आरोप केला जात आहे. सध्या तरी पोलिसांनी वाल्मीक कराड याच्यावर पवनचक्की मालकाकडून 2 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल केला आहे. परंतु, वाल्मीक कराड याच्या सांगण्यावरुनच संतोष देशमुख यांची हत्या झाली, त्यामुळे याप्रकरणातही कराड याच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी होत आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा तपास सीआयडीकडे आहे. सीआयडीचे बडे अधिकारी बीडमध्ये तळ ठोकून तपास करत आहेत. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शोधण्यासाठी सीआयडीच्या 9 पथकांमधील 150 पोलीस कर्मचारी दिवसरात्र काम करत आहेत. आरोपींची बँक खाती गोठवण्यात आली असून त्यांचे पासपोर्टही रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे आरोपींचा देशाबाहेर पळून जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. आता पोलीस संतोष देशमुख यांचे मारेकरी आणि वाल्मीक कराड यांना कधी अटक करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, वाल्मीक कराड यांना पोलिसांसमोर आत्मसमर्पण करा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार वाल्मीक कराड स्वत: बीड पोलिसांच्या स्वाधीन होतील, असे सांगितले जात आहे. वाल्मीक कराड यांनी सोमवारी रात्री स्वत:ला पुणे पोलिसांच्या हवाली केले, अशी चर्चा रंगली होती. मात्र, या बातमीची अद्याप पुष्टी होऊ शकलेली नाही. परंतु, वाल्मीक कराड हे आज संध्याकाळी किंवा उदया सकाळपर्यंत पोलिसांना शरण येतील, अशी दाट शक्यता वर्तविली जात आहे.
स्कॉर्पिओतील ठसे जुळले
सरपंच संतोष देशमुख यांचे ज्या स्कॉर्पिओ गाडीतून अपहरण करण्यात आले होते. त्या गाडीची सीआयडीकडून तपासणी करण्यात आली. या गाडीतील ठसे आणि आरोपींच्या हातांचे ठसे जुळले आहेत. याशिवाय, आरोपींचे मोबाइलही पोलिसांना सापडले आहेत. हे मोबाईल फॉरेन्सिक खात्याकडे पाठवण्यात आले आहेत. पोलीस आणि सीआयडीकडून याप्रकरणी आतापर्यंत 100 संशयितांची चौकशी करण्यात आली आहे. अजितदादा गटाच्या पदाधिकाऱ्यांचीही पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनावणे यांची रविवारी तब्बल 9 तास चौकशी करण्यात आली. पोलिसांनी माझ्याकडील माहिती घेण्याचा प्रयत्न केला. राजकीय गोष्टीत फोटो आणि फोन होत असतात. या गोष्टी सीआयडीला मिळाल्यामुळे त्यांनी मला चौकशीसाठी बोलावले होते, असे संध्या सोनावणे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.
आणखी वाचा
सुरेश धस यांची तक्रार करण्यासाठी प्राजक्ता माळी थेट सागर बंगल्यावर, देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट