बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील (Santosh Deshmukh Murder Case) आरोपी वाल्मिक कराडसंबंधी एक मोठी बातमी समोर आली आहे. शनिवारी दुपारच्या वेळी वाल्मिक कराडला श्वसनाचा त्रास होऊ लागल्यानंतर त्याचा सिटीस्कॅन (Walmik Karad Health Update) करण्यात आला. आता त्याचा अहवाल समोर आल्यानंतर पुढील उपचाराची दिशा ठरणार आहे. 

बोलण्यास आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने शनिवारी दुपारी बीड जिल्हा कारागृहात त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यावेळी तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी सिटीस्कॅन करण्याचे सल्ला दिला होता. त्यानुसार थोड्या वेळापूर्वीच बीडच्या जिल्हा रुग्णालयात वाल्मिक कराडची सिटीस्कॅन तपासणी करण्यात आली. या तपासणीचा अहवाल रात्री उशिरा येणार असून यानंतरच पुढील उपचाराची दिशा ठरणार असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

बीडच्या तुरुंगातील वरिष्ठ अधिकारी आणि महिला कर्मचारी निलंबित

वाल्मिक कराडसह संतोष देशमुख खून प्रकरणातील इतर आरोपी बीडच्या जिल्हा कारागृहात (Beed Jail) आहेत. त्यांना स्पेशल ट्रीटमेंट देण्यात येत असल्याचा आरोप देशमुख कुटुंबीयांकडून अनेकवेळा करण्यात आला आहे. कारागृह प्रशासनावर आरोप झाल्यानंतर वरिष्ठ कार्यालयाकडून त्याची गंभीर दखल घेण्यात आली होती. त्यानुसार या कारागृहाची वारंवार तपासणी केली जात आहे. 

जिल्हा कारागृहातील महिला पोलिस कर्मचाऱ्यासह वरिष्ठ तुरुंग अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलं आहे. दक्षता पथकाच्या तपासणी दरम्यान तुरुंगात गैरप्रकार आढळला होता. त्याचा अहवाल आल्यानंतर या दोघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.  डी.डी. कवाळे असे वरिष्ठ तुरुंग अधिकाऱ्याचे नाव असून सीमा गोरे असं निलंबित झालेल्या महिला पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. डी.डी.कवाळे यांनी नुकताच पदभार स्वीकारला होता. आता त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 

सगळे आरोपी एकाच तुरुंगात का? 

भाजप आमदार सुरेश धस यांनी बीड जिल्हा प्रशासनावर संताप व्यक्त केला आहे. मयत सरपंच संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांनी, मागितलेल्या जेलमधील सीसीटीव्हीच्या फुटेजवरून त्यांनी प्रशासनाला धारेवर धरलं. मकोका अंतर्गत गुन्हा दाखल असलेले सर्व आरोपी एकाच जेलमध्ये का? असा सवाल त्यांनी केला. वाल्मिक कराडसह सर्व आरोपींनी वेगवेगळ्या तुरुंगात ठेवण्याची मागणी आमदार सुरेश धस यांनी केली. 

ही बातमी वाचा: