बीड : वाल्मिक कराड यांना पवनऊर्जा क्षेत्रातील कंपनी अवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या प्रकल्प अधिकाऱ्याकडे 2 कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी सीआयडीनं केज कोर्टात हजर केलं. वाल्मिक कराड आज सकाळी सीआयडीसमोर शरण आले. अवादाचे प्रकल्प अधिकारी सुनिल शिंदे यांनी 2 कोटी रुपयांच्या खंडणीप्रकरणी दाखल केलेल्या तक्रारीवरुन वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. केज न्यायालयाच्या न्यायाधीश बाविस्कर यांच्या समोर सुनावणी सुरु झाली. सीआयडीकडून जे. बी. शिंदे  यांनी बाजू मांडली. तर, वाल्मिक कराड यांचे वकील अशोक कवडे यांनी युक्तिवाद केला. 


कोर्टात काय काय घडलं?


वाल्मिक कराड यांचे  वकील अशोक कवडे कोर्टात दाखल झाले. सरकारी वकील एस. एस. देशपांडे दाखल झाले होते. मात्र, सीआयडीचे वकील म्हणून जे.बी. शिंदे यांनी युक्तिवाद केला. सीआयडीचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील देखील कोर्टात दाखल झाले होते.  


न्यायाधीशांनी वाल्मिक कराड यांना पोलीस विरोधात तक्रार आहे का ?असं विचारलं, यावर वाल्मिक कराड यांनी नाही असं उत्तर दिलं.  सरकारी वकील जे.बी. शिंदे यांनी दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली म्हणून वाल्मिक कराड विरोधात तक्रार दाखल असल्याचं कोर्टासमोर मांडलं.   या अनुषंगाने हत्या आणि अ‍ॅट्रोसिटीचे गुन्हे दाखल आहेत. म्हणून तपास करण्यासाठी कस्टडी हवी आहे, असं म्हणत शिंदे यांनी सीआयडीच्या वतीनं 15 दिवसांची सीआयडी कोठडी न्यायालयाकडे मागितली. 


वाल्मिक कराड यांच्या वकिलाचा युक्तिवाद


वाल्मिक कराड यांचे वकील अशोक कवडे यांनी युक्तिवाद केला. ते म्हणाले, तक्रार ही खंडणी ची आहे पण यात कुठे ही दोन कोटी रुपयाची खंडणी मागितल्याची उल्लेख नाही.विष्णू चाटे याचा मोबाईल नाशिक मध्ये आहे, तो मिळून आला आहे.वाल्मिक कराड यांच्या ऑफिस मध्ये आल्याचे सांगितले पण कधी बोलावले हे स्पष्ट नाही.आम्हाला राजकीय बळी ठरवले, असा युक्तिवाद वाल्मिक कराड यांच्यावतीनं अशोक कवडे यांनी केला. वाल्मिक कराड यांच्यावरील 15 गुन्ह्यांपैकी फक्त एक गुन्हा तो ही आंदोलनाचा आहे. 14 गुन्हे निल आहेत. आम्हाला राजकारणातून गुंतवलं जातंय. 15 दिवसांच्या कोठडीची गरज नाही. राजकीय दबावातून गुन्हा दाखल केला आहे, आरोपी स्वत: हजर झाले आहेत, असा युक्तिवाद कवडे यांनी केला.


सरकारी वकील जे. बी. शिंदे यांनी पुन्हा युक्तिवाद सुरु केला. खंडणी दिली किंवा घेतली यापेक्षा मागितली गेली आहे. स्पष्टपणे 2 कोटी रुपये मागितले गेले आहेत. 


अशोक कवडे यांनी पुन्हा युक्तिवाद केला. मीडिया ट्रायल ग्रहीत धरून कारवाई करता येणार नाही, असा युक्तिवाद वाल्मिक कराड यांच्या वकिलांनी केला. आम्ही केव्हाही हजर होवू, राजकीय दबावातून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास करण्यासाठी 15 दिवसांच्या कोठडीची गरज नाही. जवळपास 30 मिनिटे केज न्यायालयात युक्तिवाद झाला.


इतर बातम्या : 


वाल्मिक कराड केज न्यायालयात हजर, पोलिसांकडून कराडच्या 15 दिवसांच्या कोठडीची मागणी