Supriya Sule : धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्याच्या मुद्यावरुन विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. याबाबत खासदार सुप्रिया सुळे (Supriya sule) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार यांच्यावर (Sharad Pawar) जेव्हा आरोप झाले होते, तेव्हा त्यांनी राजीनामा दिला होता असे सुळे म्हणाल्या. नैतिकत बघून निर्णय घ्यायला हवा असेही सुळे म्हणाल्या. मी राजीनामा का द्यायचा? या प्रकरणामध्ये मी ना आरोपी आहे, ना माझा कोणता संबंध आहे, मग माझ्या राजीनाम्याचा प्रश्नच नसल्याचं वक्तव्य मंत्री धनंजय मुंडे यांनी केलं होते. यावर सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
छगन भुजबळ यांच्याशी कौटुंबिक संबंध
आज पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त शरद पवार आणि छगन भुजबळ एकत्र येत आहेत. याबाबत बोलताना सुळे म्हणाल्या की, त्यांच्या परिवाराशी आमचे अनेक वर्षांपासून कौटुंबिक संबंध आहेत. आमच्यात कधीही अंतर आलेले नाही. आम्ही त्यात कधीही राजकारण आणले नाही आणि अणणार पण नाही असेही सुळे म्हणाल्या. आजचा दिवस उत्साहात साजरा झाला पाहिजे. पवारसाहेब मुख्यमंत्री असताना राजकीय मत बाजूला ठेवून सगळे नेते एकत्र आले होते. हे संस्कार पुढच्या पिढीपर्यंत पोहचले पाहिजेत म्हणून त्या काळापासून उपक्रम सुरू आहेत. आज आम्ही तुमच्यासमोर उभे आहोत त्या मागे ही मोठी ताकद आहे असेही सुळे म्हणाल्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहणार
आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कायदा आणि सुव्यवस्था यासंदर्भात एक पत्र लिहणार असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या. दीड महिने झाले सरकारला पण मुख्यमंत्री एकटे ॲक्शन मोडमध्ये दिसतात बाकी कोणी दिसत नाही असेही सुळे म्हणाल्या. मी मागच्या वेळेस जे बोलले ते तुम्हाला 2025 मध्ये हळू हळू दिसेल. वित्तीय तूट व्यवस्थापन (Fiscal deficit management) हा कायदा जो अटलजी यांनी आणला होता त्याबद्दल विचार केला पाहिजे. अनेक एक्स्पर्ट जे आहेत त्यांच्याशी आम्ही बोलतो आहेत असेही सुळे म्हणाल्या.
नेमकं काय म्हणाले होते धनंजय मुंडे
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मी आरोपी नाही. माझा या प्रकरणाशी कोणताही संबंध नाही मग मी राजीनामा का द्यायचा? असा सवाल धनंजय मुंडे यांनी केला आहे. अनेकजण माझा राजीनामा मागत असल्याचे मुंडे म्हणाले. संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन थेट आरोप हे वाल्मिक कराड यांच्यावर होत आहेत. हा वाल्मिक कराड मंत्री धनंजय मुंडे यांचा खास माणूस आहे. त्यामुळं धनंजय मुंडे यांना मंत्रीपदावरुन दूर करा अशी मागणी होत आहे. हा तपास सीआयडी, एसआयटी आणि न्यायालय असा तिहेरी तपास असल्यानं माझा मंत्री म्हमून दबाव असू शकत नसल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.
संतोष देशमुखांच्या खूना मागे कोण? हे शोधण्यासाठी धनंजय मुंडे यांचा राजीनामा हवा : जितेंद्र आव्हाड
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मुद्यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले की, ते गुन्हेगार आहेत, त्यांनी खून कोणी केला म्हणून राजीनामा मागितला जात नाही. खून कोणी केला आणि त्याच्या मागे कोण आहे, हे शोधण्यासाठी धनंजय मुंडे यांचा राजीनामा पाहिजे असे आव्हाड म्हणाले. उद्या जिथे चौकशी आहे, तिथे धनंजय मुंडे जाऊ शकत नाहीत का? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला. दरम्यान, धनंजय मुंडे यांच्याबाबत अद्याप अजित पवार का शांत आहेत. धनंजय मुंडे यांची विकेट घेऊन अजित पवार छगन भुजबळ यांना मंत्रीमंडळात एंन्ट्री देणार आहेत का? असा सवाल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.