Beed Water Crisis : मराठवाड्यात (Marathwada) पाणी प्रश्न गंभीर बनला असून, आता गावकरी आक्रमक भूमिका घेतांना पाहायला मिळत आहे. दरम्यान, पिण्याच्या पाण्याची मागणी करत बीडच्या (Beed) महातपूर ग्रामस्थ आणि प्रशासनामध्ये वाद निर्माण झाला. त्यानंतर हा वाद सोडवण्यासाठी आमदार प्रकाश सोळंकेंना मध्यस्ती करावी लागली. त्यानंतर हा वाद सुटल्याचं दिसून आलं.


बीडच्या माजलगाव तालुक्यातील महातपूर येथे अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांना यावं लागलं. आमदार प्रकाश सोळंके हे महातपूर येथे दौऱ्यासाठी गेले होते. याच दरम्यान ही घटना घडली आहे. महातपूर ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. अशातच प्रशासनाला पाण्यासाठी जाब विचारत त्यांच्या गाडीला घेरावा घालण्यात आला. त्यानंतर मध्यस्तीसाठी आलेल्या आमदार सोळंके यांनी हा प्रश्न सोडवण्याचं आश्वासन ग्रामस्थांना दिलं. अचानक घडलेल्या या घटनेमुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु, तहसील आणि पोलीस प्रशासन या ठिकाणी तात्काळ दाखल झाले आणि ग्रामस्थांची समजूत काढली.


जिल्ह्यात 154 टँकरव्दारे पाणीपुरवठा


बीड जिल्ह्यातील अनेक भागात पाणी टंचाई पाहायला मिळत आहे. अनेक गावात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. अशात अनेक गावात टँकरव्दारे पाणीपुरवठा केला जात आहे, बीड जिल्ह्यातील 131 गावं आणि 77 वाड्यांवर एकूण 154 टँकरव्दारे पाणीपुरवठा केला जात आहे. ज्यात 1 शासकीय आणि 153 खाजगी टँकरचा समावेश आहे. विशेष म्हणजे रोज वेगवेगळ्या गावातून टँकरचा प्रस्ताव स्थानिक प्रशासनाकडे दाखल होत आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत टँकरचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. 


माजलगाव तालुक्यात पाणी टंचाई....


मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात उन्हाची तीव्रता अधिक जाणवू लागली आहे. उन्हामुळे बोअरवेल, विहीरी, नद्या, गंगा, साठवण तलाव, बंधारे कोरडे पडले असून धरणांचा पाणीसाठाही कमी झाला आहे, त्यामुळे पाणी टंचाईच्या झळा माजलगाव तालुक्याल्यातील ग्रामीण भागात बसू लागल्या आहेत. अनेक वाड्यात सद्यस्थितीत टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. अनेक ठिकाणी पाणी टंचाई असल्याने टँकरने पाणी पुरवठा करावा, असा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यात पाणी प्रश्न गंभीर होत चालला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Marathwada Water Shortage : मराठवाड्यात टँकर संख्या एका हजार पार! 51 तालुक्यांवर पाणी संकट, भूजल पातळीत घट