बीड : प्रचंड गर्दी, मोठा उत्साह आणि सकाळपासूनच मनोज जरांगेंच्या (Manoj Jarange) भाषणाची उत्सुकता लागलेल्या बीडमधील शांतता रॅलीतून मनोज जरांगे यांनी सत्ताधारी आणि विरोधक दोघांवरही हल्लाबोल केला. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बीड (Beed) जिल्ह्यातील नेत्यांना इशारा देत महायुती व महाविकास आघाडीलाही सावधानतेचा इशारा दिला आहे. आपल्या भाषणातून छगन भुजबळ यांच्यावर तोफ डागत मराठा समाजालाही (Maratha) एकजूट राहण्याचं आवाहन त्यांनी केलं. हिंगोलीतून सुरू झालेल्या शांतता रॅलीला प्रत्येक जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आज बीडच्या माय-बाप जनतेनं रेकॉर्डब्रेक गर्दी केल्याचं जरांगे यांनी म्हटलं. आपल्य भाषणाच्या शेवटी मराठा समाज बांधवांना जरांगेंनी दोन विनंत्या केल्या आहेत. त्यानुसार, विधानसभा निवडणुकीतही एकजूट दाखवण्याचं आवाहन जरांगे यांनी केलं आहे.
लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात मनोज जरांगे पॅटर्न चालला, त्यातही बीड, जालन आणि परभणी जिल्ह्यात मनोज जरांगेंमुळेच महायुतीच्या उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळेच, आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जरांगे यांच्या शांतता रॅलीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. त्यातच, आज जरांगे यांची शांतता रॅली त्यांच्या होम ग्राऊंडवर म्हणजेच बीड जिल्ह्यात होती. त्यामुळे, बीडमधील रॅलीतून ते काय बोलतात, कोणावर निशाणा साधतात आणि मराठा समाज बांधवांना काय आवाहन करतात, याची सर्वांनाच उत्सुकता होती. बीडमधून जरांगेंनी मुंडे बंधू-भगिनींवर हल्लाबोल करत मराठा समाजालाही विनंती केली आहे. आपल्या भाषणाच्या शेवटी, मी तुम्हाला 2 गोष्टींचं आवाहन करतो, दोन गोष्टीची विनंती करतो असे म्हणत जरांगे यांनी मराठा समाजाला महत्त्वाचं आवाहन केलं आहे.
मराठा समाजाला मनोज जरांगेंच्या 2 विनंत्या
1. माझ्या मराठा बांधवांना दोन विनंत्या आहेत. पहिलं काम म्हणजे, आपल्या गोरगरिबांवर कोणी अन्याय करत असेल तर त्याच्या मदतीला जावा, केवळ बघ्याची भूमिका घेऊ नका. गरीब मराठ्यांनी मी गरीब आहे, असं म्हणायचं नाही. आपण गरीब मराठ्यांनी एकमेकांच्या मदतीला जायचं आहे, असे आवाहन जरांगे यांनी केले
2. मतदान करताना मराठ्यांनी एकगठ्ठ्या करायचं. लोकसभा निवडणुकीत मी सांगितलं, कोणाला पाडायचंय पाडा, कोणाला निवडून आणायचंय आणा. जे हुश्शार होते, त्यांनी करेक्ट कार्यक्रम केला. पण, काहींनी मतदान न केल्यामुळे 20 हजार आणि काहींनी मी नाव न घेऊन सांगितल्यामुळे कुणाला मतदान करावं हे त्यांना कळालं नाही, त्यांनी 10 हजार मतदान दुसऱ्यालाच केलं. त्यामुळे, आपलं 30 हजार मतदाना वाय गेलं, तेवढा लीड आता ठेवायचा. आता, यावेळी विधानसभेला मी डायरेक्ट नाव घेऊन सांगणार आहे, यांना पाडा. दररोज 50 एक जण मला तिकीट मागायला येतात. 70 वर्षे त्या भंगाराला दिलं, यंदा एक शिक्का मतदान हाणायचं. कोणलाही करायचं आणि 100 टक्के मतदान करायचं, असे आवाहन मनोज जरांगे यांनी बीडमधून मराठा समाजाला केलं आहे.
हेही वाचा