बीड : शिवसेनेचे (Shivsena) माजी मंत्री सुरेश नवले यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. 1996 साली उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून आम्ही बाळासाहेब ठाकरे (यांची भेट घेतली. आणि उद्धवजी यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद द्यावे असा आग्रह केला असल्याचं ते म्हणाले. या सांगण्यामागचे मुख्य सूत्रधार हे देखील उद्धव ठाकरेच होते असंही त्यांनी स्पष्ट केलं. बीडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी हा गौप्यस्फोट केला. 


माजी मंत्री सुरेश नवले हे एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये सामिल झाले आहेत. ते म्हणाले की, "1996 पासून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायची इच्छा होती. मात्र ती पूर्ण झाली नाही. ज्या वेळेस राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग करण्यात आला, त्यावेळी त्यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा पूर्ण झाली."


राज्यात 1995 साली शिवसेना-भाजप युतीचं सरकार पहिल्यांदा सत्तेत आलं होतं. त्यावेळी सुरुवातीला मनोहर जोशी यांना मुख्यमंत्रीपदाचा मान मिळाला. नंतर फेब्रुवारी 1999 ते ऑक्टोबर 1999 अशा नऊ महिन्यांच्या कालावधीसाठी नारायण राणे यांंच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. 


नारायण राणेंचा दावा 


केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या संबंधित वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले होते की, "मी मुख्यमंत्री झाल्यानंतर झाल्यानंतर उद्धव ठाकरे अचानक राजकारणात सक्रिय झाले. आपण मुख्यमंत्री झाल्याचं त्यांना पचलं नाही, त्यामुळेच त्यांच्या जवळच्या लोकांनी राजकारणात येण्याचा सल्ला दिला."


महाबळेश्वरच्या बैठकीत कार्याध्यक्षपदी, राज ठाकरेंची शिफारस 


उद्धव ठाकरे यांचे पक्षातील वर्चस्व खऱ्या अर्थाने सुरु झालं ते 2003 सालच्या महाबळेश्वरच्या बैठकीपासून. याच बैठकीत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नावाची कार्याध्यक्षपदी शिफारस केली होती. नंतरच्या काळात राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आणि उद्धव ठाकरे यांच्या नावाची शिफारस करणं आपली चूक होती अशीही कबुली दिली होती. 


दसरा मेळाव्यासाठी दोन्ही गटाकडून जोरदार तयारी 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयोजित केलेल्या दसरा मेळाव्याला बीड जिल्ह्यातून पाच हजाराहून अधिक शिवसैनिक उपस्थित राहणार असल्याची माहिती शिवसेनेतून शिंदे गटात सामील झालेले बीडचे माजी मंत्री सुरेश नवले यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. शिंदे गटाचे दोन शिवसेनाप्रमुख सध्या या मेळाव्यासाठी जास्तीत जास्त शिवसैनिकांना घेऊन जाण्यासाठी तयारी करत आहेत. 


ठाकरे गटाचे शिवसेनाप्रमुख असलेले अनिल जगताप यांनी देखील ग्रामीण भागातील शिवसैनिकांना शिवतीर्थवर घेऊन जाण्यासाठी तयारी सुरू केली आहे. जे निष्ठावंत शिवसैनिक आहे ते शिवतीर्थवर उद्धव ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी येणार आहेत, कारण महाराष्ट्रात सत्तापालट झाल्याने शिंदे गटाच्या विरोधात अनेक शिवसैनिकांच्या मनामध्ये रोष असून सात हजार शिवसैनिकांना आम्ही शिवतीर्थवर घेऊन जाणार असल्याचं ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी सांगितल आहे.


राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले. त्या आधी 2014 साली शिवसेना भाजप युतीच्या सरकारमध्ये भाजपकडे मुख्यमंत्रीपद गेलं होतं. 2019 च्या निवडणुकीमध्ये युतीला बहुमत मिळाल्यानंतर अडीच वर्षाच्या कालावधीसाठी मुख्यमंत्रीपद शिवसेनेला मिळावं या मागणीसाठी युती तुटली.