बीड :  बीड जिल्ह्यातल्या (Beed News)  माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथे काही दिवसापूर्वी एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराप्रकरणी  पीडित मुलीच्या वडिलांनी दिंद्रुड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी तुम्हाला न्याय मिळवून देतो म्हणून राष्ट्रवादीच्या अल्पसंख्यांक तालुकाध्यक्षांने पीडित मुलीच्या वडिलांकडून एक लाख 40 हजार रुपये उकळले. अखिल मोहम्मद सय्यद या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर अखेर दिंद्रुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


अखिल सय्यद हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असून तो पोलीस मित्र म्हणून देखील माजलगाव परिसरात परिचित आहे. त्याने पीडित मुलीच्या वडिलांना कारवाई करण्यासाठी पैसे लागतात असल्याच सांगून त्यांच्याकडून टप्याटप्याने एक लाख 40 हजार रुपयाची रक्कम उकळली.  एवढे पैसे देऊनही आरोपीला अटक होत नसल्याने अखिल सय्यद यांनी आपली फसवणूक केल्याचं लक्षात आले. त्यानंतर पीडितेच्या वडिलांनी न्याय मिळत नसल्याने दिंद्रुड पोलीस ठाण्यासमोर तीन दिवसापासून अमरण उपोषण चालू केले होते. या प्रकरणात दीड महिना पोलीस स्टेशनला जाऊन ही न्याय मिळत नसल्याने पीडित कुटुंब अमरण उपोषणाला बसले होते.


 पीडित मुलीच्या कुटुंबीयाने अमरण उपोषण सुरू करताच या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल राठोड यांनी दखल घेत  मुख्य आरोपी अखिल मोहम्मद सय्यद यासह सुनील दिलीप वाव्हळकर, सय्यद फरहाना, विलास खाडे याच्यासह काही अज्ञात इसमावर फसवणुकीचा गुन्हा दिंद्रुड पोलीसात दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपाधीक्षक स्वप्नील राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली दिंद्रुड ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर राडकर करत आहेत.