बीड: आवादा कंपनीकडून 2 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी सीआयडी कोठडीत असलेल्या वाल्मिक कराड याला मंगळवारी केज न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी सरकारी वकील जे बी शिंदे यांनी सीआयडीच्या बाजूने युक्तिवाद केला. आजच्या सुनावणीसाठी सीआयडी अधिकारी अनिल गुजर आणि सचिन पाटील न्यायालयात हजर होते. अनिल गुजर यांनी आपल्या वकिलांमार्फत वाल्मिक कराडच्या (Walmik Karad) 10 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. 


वाल्मिक कराड याच्या आवाजाचे नमुने घेण्यात आले आहेत. तसेच त्याचे तीन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. वाल्मिक कराडने कोणत्या गुन्ह्यातून संपत्ती कमावली, याचा तपास करण्यासाठी पोलीस कोठडी हवी असल्याचे तपास अधिकारी अनिल गुजर यांनी सांगितले. तसेच वाल्मिक कराडची भारतात अथवा भारताबाहेर काही संपत्ती आहे का याचा तपास करायचा आहे, असेही अनिल गुजर यांनी न्यायालयाला सांगितले.


दरम्यान, वाल्मिक कराड यांच्याकडून सिद्धेश्वर ठोंबरे यांनी कोर्टात युक्तिवाद करणार केला. त्यांनी सांगितले की, गेल्या 15 दिवसांपासून वाल्मिक कराड पोलिसांच्या ताब्यात आहे. आता आणखी कोणता तपास बाकी आहे. बँक खात्याची चौकशी करण्यासाठी तंत्रज्ञान उपलब्ध आहे. त्यासाठी आरोपीची गरज नाही. वाल्मिक कराड यांची यापूर्वी त्यांच्यावर दाखल झालेल्या 14 गुन्ह्यांमधून निर्दोष मुक्तता झालेली आहे. मग त्या गुन्ह्यांचा तपास का करायचा आहे, असा सवाल वकील सिद्धेश्वर ठोंबरे यांनी उपस्थित केला. 


सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड यांची एकत्र चौकशी करायची होती. तर मग दोन्ही आरोपी 10 दिवसांपासून पोलिसांच्या ताब्यात आहेत. मग तेव्हा दोघांची एकत्रित चौकशी का करण्यात आली नाही? हा सगळा तपास पोलीस 15 दिवसांपूर्वी करणार होते. मग पोलिसांनी 15 दिवसांत काय केले? वाल्मिक कराड तपासात सहकार्य करत नाही असं तुमचं म्हणणं असेल तर 15 दिवसांत त्यांनी काय सहकार्य केलं नाही, ते आम्हाला सांगा. पण आता वाल्मिक कराडच्या पोलिस कोठडीची गरज नाही, असा युक्तिवाद ॲडव्होकेट सिद्धेश्वर ठोंबरे यांनी केला. त्यामुळे आता न्यायालय वाल्मिक कराडला पोलीस कोठडी देणार की न्यायालयीन कोठडी, या निर्णयाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.



आणखी वाचा


विस्कटलेले केस, वाढलेली पांढरी दाढी; 13 दिवस पोलीस कोठडीत राहिल्यानंतर ऐटीत राहणाऱ्या वाल्मिक कराडचं रुपडं पालटलं


पुण्याच्या फर्ग्युसन रोडवर वाल्मिक कराडची प्रॉपर्टी, एकाच बिल्डिंगमध्ये सहा अलिशान ऑफिस, आता कर्दनकाळ ईडीची एन्ट्री होणार?