बीड : शरद पवार यांची साथ सोडून भाजपासोबत गेलेले अजित पवार यांनी आता शरद पवार यांच्या संस्थेतील देखील पदाचे राजीनामे द्यावेत असं वक्तव्य संजय राऊत यांनी केल्यानंतर राज्याचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी त्याला प्रत्युत्तर दिलं आहे. संस्थेतील राजीनामाचा प्रश्न हा अजित पवार आणि शरद पवार एकत्र मिळून निर्णय घेतील, कारण हा त्यांचा कौटुंबिक प्रश्न आहे, संजय राऊत हे पवार कुटुंबाचे सदस्य झाले आहेत का? असा सवाल धनंजय मुंडे यांनी केला. येत्या 27 तारखेला बीडमध्ये होणारी सभा ही उत्तर सभा नसून बीड जिल्ह्याच्या विकासाची, सन्मानाची आणि अस्मितेची सभा असेल असंही ते म्हणाले. 


येत्या 27 तारखेला अजित पवार यांची बीडमध्ये जाहीर सभा होणार असून या सभेच्या तयारीसाठी धनंजय मुंडे यांनी बीडमध्ये आज एक बैठक घेतली. त्यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, "27 तारखेची सभा ही यापूर्वीच होणार होती, मात्र काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे 17 तारखेला झालेल्या शरद पवार यांच्या सभेला उत्तर देण्यासाठी ही सभा नसून बीड जिल्ह्याची अस्मिता, विकास आणि सन्मानाची सभा आहे. 17 तारखेला झालेल्या सभेला 2024 मध्ये जनताच उत्तर देईल."


बीडमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची 17 तारखेला सभा झाली आणि या सभेमध्ये परळी येथील बबन गीते यांनी शरद पवार यांच्या गटामध्ये प्रवेश केला. त्यानंतर धनंजय मुंडे यांच्या समोर एक आव्हान उभं राहिल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र त्याला उत्तर देताना धनंजय मुंडे म्हणाले की, आतापर्यंत मी माझ्या आयुष्यात खूप संघर्ष केला आहे. त्यामुळे माझ्यासमोर कुठलंही मोठं आव्हान नसून परळी मतदारसंघात केलेली काम आणि विकास आणि लोकांच्या मनामध्ये मी स्थआन मिळवलेलं आहे. 


जिल्हाध्यक्ष काय म्हणाले ?


राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांची बीडला सभा झाल्यानंतर त्याला उत्तर देणारी उत्तर सभा ही बीड शहरातील मल्टीपर्पज ग्राउंड वरती येत्या 27 तारखेला होणार आहे. या संदर्भामध्ये बीडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांनी सुद्धा बीडमध्ये नियोजित सभा होणारच असल्याचे सांगितले आहे. बीडमध्ये होणाऱ्या या सभेला मंत्रिमंडळातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नऊ मंत्री येणार असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांनी 27 तारखेला सभा होणार आहे, अशी माहिती दिली आहे.


पवारांच्या सभेत पैसे देऊन गर्दी जमवल्याचा आरोप? 


दरम्यान, 17 ऑगस्ट रोजी बीडमध्ये झालेल्या शरद पवारांच्या सभेत पैसे देऊन लोकांना जमवल्याचा आरोप होत आहे. तर, काही महिला पैसे वाटप करत असल्याचे देखील तथाकथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात पवारांच्या सभेला महिलांना पैसे देऊन आणण्यात आल्याचा दावा केला जात आहे. मात्र, यावर अजून तरी दोन्ही गटाची अधिकृत अशी प्रतिक्रिया आलेली नाही. 


ही बातमी वाचा: