बीड: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेला आज 19 दिवस पुर्ण झाले आहेत. या घटनेवरून मस्साजोगसह राज्यातील नागरिकांनी आणि नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे, या घटनेतील आरोपी अद्याप मोकाट फिरत आहेत, त्याच्या निषेधार्थ आज बीडमध्ये आज सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. बीडमध्ये मूक मोर्चाला सुरुवात झाली आहे, हजारो लोक हातामध्ये छोटे-छोटे पोस्टर घेऊन संतोष देशमुख यांना न्याय देण्याची मागणी करत आहे, हजारो लोक मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं चित्र आहे. सर्वपक्षीय नेते, आमदार, खासदार, सामाजिक कार्यकर्ते, संघटना यांच्यासह बीड जिल्हा रस्त्यावर उतरल्याचं दिसून येत आहे. 


सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी जनसागर रस्त्यावरती उतरला आहे. बीडमध्ये सर्व संघटना आणि सर्वपक्षीय नेते रस्त्यावर आले आहेत, बीडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथून मूक मोर्चा काढण्यात आला. हजारोंच्या संख्येने मोर्चात नागरिकांची उपस्थिती होती. हातात न्यायाचे फलक घेऊन महिला देखील या मोर्चात सामील झाल्या आहेत. आरोपीला फाशी झाली पाहिजे अशा प्रकारच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या आहेत. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावामध्ये कडकडीत बंद आहे. अख्खं गाव बीड मोर्चामध्ये सहभागी झालं असल्याने गावकरी बीडमध्ये पोहचले आहेत. गावात शुकशुकाट आहे.


नेमकं प्रकरण काय?


बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचे 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करण्यात आले. त्यानंतर त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर केज आणि मस्साजोग या दोन ठिकाणी आंदोलन करण्यात आली. आरोपींना तातडीने अटक करून त्यांना शिक्षा देण्याची मागणी झाली. मात्र, यामध्ये राजकीय हस्तक्षेप असल्याची चर्चा सुरू झाली आणि प्रकरण वाढलं. आज 19 दिवस होऊनदेखील या प्रकरणातील सूत्रधार अद्याप मोकाट फिरत आहेत. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांसह मस्साजोगच्या ग्रामस्थांनीही या हत्या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करुन आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी संपूर्ण बीज जिल्हा आणि सर्वपक्षीय नेते आज रस्त्यावरती उतरले आहेत. 


देशमुख प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवावं मराठा क्रांती मोर्चाची मागणी


आजचा बीडचा जो मोर्चा आहे तो सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी आहे. त्यांच्या मुलीला, त्यांच्या आईला, पत्नीला, त्यांच्या भावाला, न्याय देण्यासाठी या मोर्चाचा आयोजन केलं आहे. या मोर्चाला बीडसह राज्यभरातून जनतेचा प्रतिसाद आहे. त्याचबरोबर सर्व संघटना आलेल्या आहेत. आम्ही दोन दिवसाचा अल्टीमेटम सरकारला दिला होता. त्यांनी दोन दिवसामध्ये मोर्चांपूर्वी वाल्मीक कराडला आणि त्याच्या गुंडांना ताब्यात घ्यायला सरकारने सुरुवात करायला पाहिजे होती. सरकार कारवाई केल्यासारखा दाखवते, पण अद्याप आरोपी मोकाट फिरत आहेत. आज 19 दिवस झाले आहे तरी या प्रकरणातील सूत्रधार मोकाट फिरतो आहे. आमच्या सर्वांचा एकच म्हणणं आहे, आज हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार आहे. या मोर्चातून सरकारने धडा घ्यावा बोध घ्यावा आणि तात्काळ या प्रकरणातील आरोपींना अटक करावी.


 त्याचबरोबर ही टोळी चालवणारा आणि टोळीतला एका-एका लोकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करावी, तसे निर्देशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. मात्र, ते कधी लावणार असा प्रश्न आहे. तो जो वाल्मिक कराड आहे, त्याला प्रमुख आरोपी करा आणि जितके आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा द्या. फास्टट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून हे प्रकरण चालवा. या केसच्या संदर्भामध्ये आमची मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून मागणी आहे. यामध्ये वाल्मीक कराड आणि सर्व आरोपींना फाशीपर्यंत पोहोचवण्यासाठी उज्वल निकम आणि सतीश मान शिंदे यांची नियुक्ती करावी. हे प्रकरण बीडमध्ये न ठेवता हे प्रकरण मुंबईमध्ये वर्ग करण्यात यावं, कारण बीडमध्ये जर हा खटला चालवला तर राजकीय हस्तक्षेप होईल आणि या कुटुंबाला न्याय मिळणार नाही आणि यासाठी सरकारला शेवटचा अल्टिमेटम दिला आहे, सरकारने तात्काळ याबाबतचा निर्णय घ्यावा अन्यथा याच्या परिणाम सरकारला भोगावे लागतील असे मराठा क्रांती मोर्चा च्या वतीने सांगण्यात आलेलं आहे.


आणखी वाचा - Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवावं, उज्ज्वल निकम, सतीश माणशिंदेंची नियुक्ती करावी; मराठा क्रांती ठोक मोर्चाची मागणी