बीड: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेला आज 19 दिवस पुर्ण झाले आहेत. या घटनेवरून राज्याचं राजकारण देखील तापलं आहे. या घटनेचा मुख्य सूत्रधार अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्यामुळे विरोधक आणि सत्ताधार यांच्यात देखील आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहे, तर दुसरीकडे या घटनेने बीडच्या गुन्हेगारीवर बोट ठेवलं आहेस, त्यामुळे राज्यात सध्या संतोष देशमुख यांना न्याय मिळावा, त्यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करून शिक्षा करावी अशी मागणी राज्यभरातून केली जात आहे. दरम्यान सरपंच संतोष देशमुख यांचं प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावे, अशी मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चाने केली आहे.


बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण आणि हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावे
सर्व आरोपीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी, त्याचप्रमाणे या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी. या प्रकरणामध्ये जेष्ठ विधीतज्ज्ञ उज्ज्वल निकम व विधी तज्ज्ञ सतीश माणशिंदे यांची नियुक्ती व्हावी, त्याचप्रमाणे सदर प्रकरण बीड या ठिकाणी न चालवता मुंबई न्यायालायकडे वर्ग करण्यात यावे, अशी मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चाने केली आहे. सदर प्रकरण बीडमध्ये चालवू नये कारण राजकीय हस्तक्षेपामूळे संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळू देणार नाहीत यासाठीचं हे प्रकरण मुंबईला वर्ग करण्याची मागणी करण्यात आली आहे. 


काय मागणी आहे मराठा क्रांती मोर्चाची?


आजचा बीडचा जो मोर्चा आहे तो सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी आहे. त्यांच्या मुलीला, त्यांच्या आईला, पत्नीला, त्यांच्या भावाला, न्याय देण्यासाठी या मोर्चाचा आयोजन केलं आहे. या मोर्चाला बीडसह राज्यभरातून जनतेचा प्रतिसाद आहे. त्याचबरोबर सर्व संघटना आलेल्या आहेत. आम्ही दोन दिवसाचा अल्टीमेटम सरकारला दिला होता. त्यांनी दोन दिवसामध्ये मोर्चांपूर्वी वाल्मीक कराडला आणि त्याच्या गुंडांना ताब्यात घ्यायला सरकारने सुरुवात करायला पाहिजे होती. सरकार कारवाई केल्यासारखा दाखवते, पण अद्याप आरोपी मोकाट फिरत आहेत. आज 19 दिवस झाले आहे तरी या प्रकरणातील सूत्रधार मोकाट फिरतो आहे. आमच्या सर्वांचा एकच म्हणणं आहे, आज हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार आहे. या मोर्चातून सरकारने धडा घ्यावा बोध घ्यावा आणि तात्काळ या प्रकरणातील आरोपींना अटक करावी.


 त्याचबरोबर ही टोळी चालवणारा आणि टोळीतला एका-एका लोकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करावी, तसे निर्देशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. मात्र, ते कधी लावणार असा प्रश्न आहे. तो जो वाल्मिक कराड आहे, त्याला प्रमुख आरोपी करा आणि जितके आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा द्या. फास्टट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून हे प्रकरण चालवा. या केसच्या संदर्भामध्ये आमची मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून मागणी आहे. यामध्ये वाल्मीक कराड आणि सर्व आरोपींना फाशीपर्यंत पोहोचवण्यासाठी उज्वल निकम आणि सतीश मान शिंदे यांची नियुक्ती करावी. हे प्रकरण बीडमध्ये न ठेवता हे प्रकरण मुंबईमध्ये वर्ग करण्यात यावं, कारण बीडमध्ये जर हा खटला चालवला तर राजकीय हस्तक्षेप होईल आणि या कुटुंबाला न्याय मिळणार नाही आणि यासाठी सरकारला शेवटचा अल्टिमेटम दिला आहे, सरकारने तात्काळ याबाबतचा निर्णय घ्यावा अन्यथा याच्या परिणाम सरकारला भोगावे लागतील असे मराठा क्रांती मोर्चा च्या वतीने सांगण्यात आलेलं आहे.


आणखी वाचा - Santosh Deshmukh Case: 'आश्वासनावर विश्वास ठेवला मात्र...', संतोष देशमुखांच्या भावाने व्यक्त केल्या संतप्त भावना; म्हणाले, 'कुटुंब पूर्ण पोरकं केलं...'