बीड: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील आरोपींची बी टीम बीडमध्ये अजूनही सक्रिय असल्याचा गंभीर आरोप धनंजय देशमुख यांनी केला. संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder) यांच्या हत्याप्रकरणाचा त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. त्यांनी नुकताच बीड पोलिसांवर (Beed Police) एक गंभीर आरोप केला. बीड पोलिसांकडून संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपींना मदत करणाऱ्यांना अद्याप ताब्यात घेण्यात आलेले नाही. पोलिसांकडून त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोप धनंजय देशमुख यांनी केला. ते गुरुवारी बीडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.


संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात वाल्मिक कराड यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. वाल्मिक कराड या हत्याप्रकरणाचा सूत्रधार असून अन्य जणांनी संतोष देशमुख यांनी निर्घृणपणे हत्या केल्याचा आरोप आहे. या सर्वांना पोलिसांनी अटक केली असली तरी त्यांची बी टीम अजूनही ॲक्टिव्ह असल्याचे धनंजय देशमुख यांनी म्हटले. या बी टीमने विष्णू चाटे, सुदर्शन घुले, कृष्णा सांगळे यांच्यासह अन्य आरोपींना पळून जाण्यासाठी मदत गेली. त्यांनी आरोपींना गाडी आणि पैसे पुरवले, तसेच इतर मदतही केली. मात्र, बीड पोलिसांकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली नाही, असे धनंजय देशमुख यांनी म्हटले. मात्र, ही बी टीम म्हणजे कोण, याबाबत धनंजय देशमुख यांनी अद्याप स्पष्टपणे माहिती दिलेली नाही.


यापूर्वी बीड पोलीस आणि सीआयडीने वाल्मिक कराड आणि त्याच्या सहकाऱ्यांना पळून जाण्यास मदत करणाऱ्या लोकांची चौकशी केली. मात्र, संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाशी त्यांचा थेट संबंध आढळून आलेला नाही, असे सीआयडीचे म्हणणे आहे. त्यामुळे धनंजय देशमुख म्हणत असलेली बी टीम कोण, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. धनंजय देशमुख यांनी यापूर्वी सीआयडीकडे अर्ज केला होता. त्यामध्ये ज्या लोकांनी सुदर्शन घुले, प्रतीक घुले, प्रतीक सांगळे यांना पळून जाण्यासाठी मदत केली त्याचे पुरावे धनंजय देशमुख यांनी पोलिसांना दिले होते. त्यानंतरही आरोपींना सहकार्य करणारे इतक्या मोठ्या प्रमाणात बाहेर असतील तर ही गंभीर गोष्ट आहे, अशी चर्चा आता सर्वत्र सुरु झाली आहे.


आरोपींना पोलिसांची मदत 


धनंजय देशमुख यांनी काही दिवसांपूर्वी बीड पोलिसांवर आणखी एक गंभीर आरोप केला होता. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आरोपींना पळून जाण्यासाठी पोलिसांनी मदत केली असावी, असा संशय त्यांनी व्यक्त केला. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आरोपी स्कॉर्पिओ कारने धाराशिव जिल्ह्यातील वाशी या ठिकाणी पोहोचले. येथील सीसीटीव्ही फुटेज नुकतेच समोर आले होते. वाशी येथील पारा चौकात सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे (Krishna Andhale) आणि त्याचे साथीदार स्कॉर्पिओ गाडी सोडून पळत जाताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. यावेळी पोलिसांची गाडी आरोपींचा पाठलाग करत होती. पोलीस त्यांच्यापासून हाकेच्या अंतरावर होते. तरीही हे आरोपी पोलिसांच्या (Beed Police) हाती का लागले नाहीत? त्यावेळी पोलीस जवळपास आहे, ही टीप आरोपींना कोणी दिली होती, तो व्यक्ती पोलीस अधिकारी होता का?, असा सवाल धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) यांनी उपस्थित केला होता.


सुदर्शन घुलेला आज न्यायालयात हजर करणार?


दोन दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर खंडणी प्रकरणात सुदर्शन घुलेला केज न्यायालयात आज हजर केले जाणार आहे. खंडणी प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुलेची आज दोन दिवसांची पोलीस कोठडी संपणार आहे. त्यामुळे त्याला साधारण अकरा वाजता केज न्यायालयात हजर केले जाणार आहे. केज पोलीस ठाण्यात सुदर्शन घुलेची दोन दिवस चौकशी करण्यात आली. या दरम्यान त्याच्या आवाजाचे नमुने देखील सीआयडीने घेतले आहेत. पवनचक्की प्रकल्प अधिकाऱ्यास दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी वाल्मीक कराड विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले या तिघांचे आवाजाचे नमुने आतापर्यंत घेण्यात आले आहे.



आणखी वाचा


संतोष देशमुखांच्या मारल्यानंतर पळून जाणाऱ्या कराड गँगला पोलिसांनीच टीप दिली, स्कॉर्पिओतून उतरल्यानंतर काय घडलं?