मुंबई : परळी येथील प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंग (Parli Vaijnath Jyotirlinga Temple) मंदिर विकासासाठी आता 286.68 कोटी रुपये मिळणार आहेत. मुंबई येथे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या शिखर समितीच्या बैठकीत परळी येथील वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकासाच्या 286.68 कोटींच्या सुधारित आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या तसेच परळीचे ग्रामदैवत असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकासाचा मूळ आराखडा हा 133 कोटींचा होता. मात्र मंदिरात दगडी भिंती बांधून जीर्णोद्धार करणे, यात्री प्रतीक्षालय अशी एकूण 92 कामे करावयाची असून, या कामांची किंमत अनेक पटींनी आता वाढली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी बीड यांनी या कामाचा सुधारित आराखडा मान्यतेस्तव सादर केला होता. धनंजय मुंडे यांच्या या प्रयत्नांना आता यश आले आहे.


अनेक शतकापूर्वी वैद्यनाथ मंदिराचा जीर्णोद्धार राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केला होता. त्याच धर्तीवर आता नव्याने जीर्णोद्धार व विकास व्हावा, मेरू पर्वत, प्रदक्षिणा मार्ग विकसित व्हावा, वैद्यनाथ ज्योतिर्लिंग स्थळ मंदिरांसह परिसरातील अन्य सर्व मंदिरांचेही संवर्धन व्हावे, यादृष्टीने हा विकास आराखडा मंजूर होणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले. 


जुन्या मंदिरांना रंग न देता त्यांना दगडासारखा रंग द्यावा, मंदिराची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी मंदिर समितीसह परळी नगर परिषदेने घ्यावी, तसेच ठिकठिकाणी दाट सावली देणारी झाडे लावावीत शिवाय पाय घसरणार नाहीत अशा फरश्यांचा वापर पायऱ्यांमध्ये करावा, अशा सूचना यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केल्या. तर, बैठकीनंतर धनंजय मुंडे यांनी या 286.68 कोटींच्या सुधारित आराखड्यास मान्यता दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत. 


बैठकीत यांची उपस्थिती...


या बैठकीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, कृषिमंत्री धनंजय मुंडे, मुख्य सचिव मनोज शौनिक, नगर विकास तसेच वित्त व नियोजन विभागाचे सचिव, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे सचिव त्याचबरोबर विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड (ऑनलाइन), बीडच्या जिल्हाधिकारी श्रीमती दीपा मुधोळ-मुंडे, माजी नगराध्यक्ष तथा गटनेते वाल्मिक अण्णा कराड, परळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे, नगर अभियंता श्री.बेंडले, आर्किटेक्ट कृष्णकुमार बांगर यांसह आदी उपस्थित होते.


इतर महत्वाच्या बातम्या: 


पाचवे ज्योतिर्लिंग परळीत की झारखंडमध्ये?; वैद्यनाथाचं दर्शनानंतरही राष्ट्रसंत मोरारी बापूंचं मौन