बीड : एकीकडे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर संपूर्ण बीड जिल्ह्यासह राज्याचं राजकारण ढवळून निघाल्याचं चित्र आहे. त्याचसोबत वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर परळी बंदची हाक देण्यात आली, समर्थकांनी आंदोलन उभं केलं. तर त्याच वेळी या जिल्ह्याच्या मंत्री असलेल्या पंकजा मुंडे यांनी मात्र यापासून स्वतःला दूर ठेवल्याचं दिसून येतंय. जिल्ह्यात काय सुरू आहे ते मला काही माहिती नाही, मी माझ्या रोजच्या कामात व्यस्त आहे. माझ्यासाठी काम महत्त्वाचं आहे असं वक्तव्य त्यांनी केलं. बीडमधील तणाव निवळावा यासाठी आपण गृहमंत्र्यांशी चर्चा करू असंही त्या म्हणाल्या.
धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड याला मकोका लावण्यात आला असून त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर परळीमध्ये त्याच्या समर्थकांनी आंदोलन सुरू केलं. मस्साजोगचे संरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांनीही धनंजय मुंडे यांच्यावर यावरून निशाणा साधला आहे. त्याचवेळी त्यांच्या बहीण आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी मात्र या सर्वापासून स्वतःला दूर ठेवल्याचं दिसून येत आहे.
या गोष्टी माझ्यासाठी महत्त्वाच्या नाहीत
बीडमध्ये जे काही सुरू आहे त्याबद्दल मला काहीच माहिती नाही. मी माझ्या रोजच्या नियोजनाप्रमाणे काम करत आहे. त्यामुळे या गोष्टी माझ्यासाठी आता मॅटर करत नाहीत. माझ्यासाठी रोजचं काम महत्त्वाचं आहे अशी पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली.
बीडमध्ये सध्या जो तणाव निर्माण झाला आहे त्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा करणार असल्याचं पंकजा मुंडे यांनी यावेळी स्पष्ट केलं.
वाल्मिक कराडला सात दिवसांची पोलिस कोठडी
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मकोका लावल्यानंतर, वाल्मिक कराडला सात दिवसांची एसआयटी कोठडी सुनावण्यात आली. एसआयटीतर्फे तपास अधिकारी अनिल गुजर यांनी संपूर्ण तपासाची माहिती देत युक्तिवाद केला. दरम्यान, वाल्मिक कराडने हत्येच्या दिवशी संतोष देशमुखांना धमकी दिल्याचा मोठा दावाही एसआयटीकडून करण्यात आला. या प्रकरणाचे गांभीर्य लक्ष्यात घेता एसआयटीने 10 दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली होती. पण न्यायालयाने त्याला सात दिवसांची कोठडी सुनावली.
वाल्मिक कराडच्या मूळ गावी आंदोलन
कराडला कोठडी सुनावल्यानंतर त्याचं मूळगाव असलेल्या पांगरीत महिला आणि समर्थक आक्रमक झाले. त्यांनी थेट राष्ट्रीय महामार्गावरच ठिय्या मांडत, घोषणाबाजीला सुरुवात केली. यावेळी काही महिलांनी अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच त्यांना अटकाव केला. तर काही महिलांनी आक्रोश करत अन्याय होत असल्याचा आरोप केला. याशिवाय कराड समर्थकांनी रस्त्यावर टायर पेटवून रास्तारोको करण्याचा प्रयत्म केला.
ही बातमी वाचा: