Pankaja Munde Beed Crime : बीड जिल्ह्यातील एका खाजगी कोचिंग क्लासमध्ये दोन शिक्षकांनी नीटच्या परिक्षेची तयारी करणाऱ्या एका 17 वर्षीय मुलीचा लैंगिक छळ आणि छेडछाड केल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. विजय पवार आणि प्रशांत खाटोकर असे या दोन शिक्षकांचे नाव असून या दोन्ही शिक्षकांविरोधात पोस्को कायद्या अंतर्गत बीड येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेचे पडसाद आता संपूर्ण बीडमध्ये उमटत आहेत. बीड मधील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळाप्रकरणी आज बीड बंदची हाक देण्यात आली होती. मात्र आरोपी शिक्षकांना अटक झाल्यानं तूर्तास बंद स्थगित करण्यात आलाय. बीड न्यायालयाने दोन्ही शिक्षकांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणावरून माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आरोपी शिक्षक विजय पवार हा आमदार संदीप क्षीरसागर राईट हॅन्ड असल्याचा आरोप केलाय. आता यावर मंत्री पंकजा मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
पंकज मुंडे म्हणाल्या की, एका अल्पवयीन मुलीवर जर अत्याचार होत असेल तर माझी प्रचंड संतप्त भूमिका आहे. मी याबाबत एसपींशी सविस्तर चर्चा केली आहे. या घटनेची सविस्तर माहिती मी घेतलेली आहे. त्या मुलीच्या पालकांशी देखील मी बोललेली आहे. जिल्ह्यात अशा आणखी काही केसेस असतील तर त्यांचा देखील शोध घ्यावा आणि त्याची संपूर्ण चौकशी करावी, असा आदेश मी एसपींना दिल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यावर कडक कारवाई व्हावी
या घटनेतील आरोपीला आमदार संदीप क्षीरसागर यांचा वरदहस्त असल्याचा आरोप केला जात आहे. याबाबत विचारले असता पंकजा मुंडे म्हणाल्या की, जो आरोपी असतो तो कोणाचा राईट, लेफ्ट हॅन्ड आहे, याला काहीच अर्थ नाही. शासनाच्या दृष्टीने त्याच्यावर तशीच कारवाई होते. एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या माणसावर कडक कारवाई व्हावी, असे त्यांनी म्हटले.
अंजली दमानियांनी केली CDR तपासणीची मागणी
दरम्यान, बीडमधील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळाप्रकरणी अंजली दमानिया यांनी एक्स पोस्ट केलीय. या पोस्ट मधून कोचिंग क्लासच्या मालकाला आमदार संदीप क्षीरसागर पदोपदी मदत करायचे? त्यांचा राजाश्रय होता ह्यांना? असा सवाल उपस्थित केला. तर या प्रकरणात सक्त कारवाई होणे गरजेचे असून सगळ्या सीडीआरची तपासणी झाली पाहिजे, अशी मागणी दमानिया यांनी केली.
आणखी वाचा